डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या दहाव्या स्मृतितिथिनिमित्त ‘स्मृतिजागर’ साजरा

कणकवली येथील प्रसिद्ध दंतवैद्य आणि साहित्यिक कै. डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या दहाव्या स्मृतितिथिनिमित्त ‘स्मृतिजागर’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. को. म. सा. प. कणकवली शाखा आणि वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहमध्ये घटस्थापना, रविवार दि. 11 ऑक्टोबर रोजी घेण्यात आला. डॉ. करंदीकर यांच्या निवडक साहित्याचे अभिवाचन आणि त्यांच्याविषयीची मनोगते असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. करंदीकरविरचित श्री मांगिरीश सुप्रभातम या स्तोत्राचे ध्वनिमुद्रण ऐकवून झाली. राजस रेगे, डॉ. विनायक करंदीकर, मीरा आपटे, हेमंत पाटकर यांनी डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या निवडक लेखांचे, निबंधांचे आणि कवितांचे अभिवाचन केले. डॉ. करंदीकर पीएच डी चे संशोधन मार्गदर्शक डॉ. सुरेश जोशी यांचे ध्वनिमुद्रित विचार ऐकवण्यात आले. विद्या घाणेकर यांनी चंदनी धुक्यामध्ये या पुस्तकाच्या दया पवार लिखित प्रस्तावनेतील निवडक अंशाचे अभिवाचन केले. आरोही मेस्त्री हिने पहिला माझा नंबर या नाटकमधील एका गाण्याचे साभिनय गायन केले. उज्ज्वला धानजी आणि तेली सर यांनी डॉ. करंदीकरांविषयी आठवणींना उजाळा दिला. डॉ. विनायक करंदीकर यांनी बाबांविषयी लिहिलेल्या एका विस्तृत लेखाचे अभिवाचन केले. मनोज मेस्त्री यांनी संगीतबद्ध केलेल्या अक्षरांच्या आरती या कवितेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक को. म. सा. प. चे उपाध्यक्ष राजस रेगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर प्रसाद घाणेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच कार्यक्रम संपताना कणकवली येथील रंगकर्मी सुहास वरुणकर यांच्या निधनाचे वृत्त आल्यामुळे त्याविषही शोकभावना व्यक्त करण्यात आल्या. या कार्यक्रमाला को म सा प शाखा कणकवलीचे राजस रेगे, आणि आचरेकर प्रतिष्ठानचे पदाधिकारी- कार्यकारिणी सदस्य, नगर वाचनालयाचे उपाध्यक्ष तानवडे सर, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी जे कांबळे, डॉ. करंदीकर यांचे कुटुंबिय आणि कणकवली येथील अनेक साहित्यरसिक उपस्थित होते.






