भजनाच्या माध्यमातून संतविचार जनमानसात पोहोचतात – ऍड. संदेश तायशेटये

‘कुडाळेश्वर’ च्या ५१ व्या भजन स्पर्धेचा शुभारंभ
जिल्हाभरातून २ महिला संघांसह २३ संघ सहभागी
भजनाच्या माध्यमातून संतांचे सद्विचार जनमानसापर्यंत पोहोचतात. श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या भजन स्पर्धेच्या माध्यमातून हे कार्य गेली ५१ वर्ष अखंड सुरु आहे. मंडळाचं हे सातत्य वाखाणण्याजोगं आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वकील ऍड. संदेश तायशेटये यांनी केले. श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित ५१ व्या कै ऍड. अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा शुभारंभ रविवारी श्री देव कुडाळेश्वर मंदिरामध्ये झाला. या स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून ऍड. तायशेटये बोलत होते. १९ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत जिल्हाभरातून २३ भजनी संघ सहभागी झाले असून त्यात दोन महिला संघाचा समावेश आहे.
५१ व्या कै अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर उद्योजक प्रदीप माने, ऍड. संदेश तायशेटये, पोलीस निरीक्षक विकास बडवे, बबन परब, अरविंद शिरसाट, स्थानिक देवस्थान समिती अध्यक्ष गोपाळ उर्फ महेश राऊळ, उपाध्यक्ष भाऊ राऊळ, शेखर उर्फ पपू नाईक, नारायण राऊळ, किशोर काणेकर, परीक्षक मोहन मेस्त्री आणि योगेश प्रभू उपस्थित होते. उद्योजक प्रदीप माने आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. अभय देसाई यांचे सुपुत्र अमेय देसाई यांच्या हस्ते अभय देसाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर रंगमंचावर उभारलेल्या विठ्ठल मूर्तीच तसेच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. तसेच समई प्रज्वलन करण्यात आलं.
यावेळी बोलताना ऍड. संदेश तायशेटये यांनी कुडाळेश्वर मंदिर परिसरातील आपल्या आठवणींना उजाळा दिला. मंदिराच्या धर्मशाळेत भरणाऱ्या मराठी शाळेच्या तिसरी चौथीत शिकणारा मुलगा जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या एका भजन स्पर्धेचे अध्यक्षस्थान भूषवितो हा श्री कुडाळेश्वर महाराजांचा आशीर्वादच आहे असं ऍड. तायशेटे यांनी सांगितले. या मंडळाने सातत्य राखून ५१ वर्ष हि भजन स्पर्धा सुरु ठेवल्याबद्दल त्यांनी मंडळाचं कौतुक केलं. स्पर्धा असावी पण ती निकोप असावी असं मार्गदर्शन त्यांनी सहभागी स्पर्धकांना केलं. संगीत आणि अध्यात्म यांची समाजाला गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
परीक्षक योगेश प्रभू यांनी सलग ५१ वर्ष हि स्पर्धा सुरु असल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले. ५१ पैकी गेली २५ वर्ष या ना त्या कारणाने आपल्याला हा स्पर्धेशी निगडित राहता आले याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्पर्धेतून नोटेशन वगळण्यासारखे महत्वाचे निर्णय या स्पर्धेतून घेतले गेल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी देखील स्पर्धेच्या सातत्याबद्दल मंडळाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्थानिक देवस्थान समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गोपाळ उर्फ महेश राऊळ, उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल भाऊ राऊळ आणि पुरस्कार प्राप्त निलेश कुडाळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत किशोर काणेकर आणि नारायण राऊळ यांनी केले. यावेळी सुरेश राऊळ, बाळू कुडाळकर, केदार राऊळ, सुशांत राऊळ, श्रीकृष्ण कुंटे, नंदू कुंटे, निलेश कुडाळकर आदी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उदय वेलणकर यांनी केले.
या भजन स्पर्धेत एकूण २३ संघ सहभागी झाले आहेत. त्यात दोन महिला भजनी मंडळांचा सहभाग आहे. उदघाटन सोहळ्यानंतर एका महिला भजन मंडळाने सादर केलेल्या भजनाने स्पर्धेला सुरुवात झाली. १९ ऑक्टोबर पर्यंत हि स्पर्धा चालणार आहे. स्पर्धेला भजनप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






