राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते सन्मान

NCERT दिल्ली व SCERT पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे ( यशदा ) येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कलाउत्सव स्पर्धा – 2025 मध्ये लोकसंगीत समूह वाद्य वादन या कला प्रकारामध्ये संगीत शिक्षक संदिप पेंडुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण या विद्यालयाचा देशामध्ये प्रथम क्रमांक आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे अशा भावना जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोंडमिसे यांनी व्यक्त केल्या… या अभुतपुर्व यशाबद्दल मार्गदर्शक संगीतशिक्षक संदिप पेंडुरकर सर व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते विद्यार्थी आयुष प्रशांत मांगले, आर्या अनिल मोसमकर, सुमित रवींद्र ठोसर व वंश मारुती कानडे यांचा तृप्ती धोंडमिसे यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कणकवली प्रांत मान. जगदीश कातकर, तहसीलदार मान.दीक्षांत देशपांडे, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी लोकरे, प्राचार्य संजय सानप, विजय देसाई, महेश कोळसुलकर,रमाकांत राऊत, पत्रकार संतोष पाटणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा हा कलाकारांची खाण आहे. अनेक बाल संगीत रत्ने या भूमीमध्ये आहेत. त्यांना शोधून त्यांच्यातील कला गुणांना वाव देण्याचे काम, त्यांच्या कलेला पैलू पाडण्याचे महत्त्वपूर्ण व अवघड काम संदिप पेंडुरकर सर करत आहेत. त्यांचे खुप मोठे योगदान या यशामध्ये आहे, असे गौरवपूर्ण उद्गार छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व समाधान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी खारेपाटण येथे मान्यवरांनी व्यक्त केले.





