ललितोत्सवाने झाली संस्थान आचरे च्या रामनवमी उत्सवाची सांगता

आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाची सांगता रविवारी पहाटे लळीताने झाली. शनिवारी रात्री नऊ वाजल्या पासून स्थानिक भजनमंडळींनी रामेश्वर मंदिरात भजन सेवेला सुरुवात केली होती यात काकड आरती मंडळ, विश्वकर्मा भजन मंडळ आचर,बालगोपाळ भजन मंडळ वरचीवाडी,शिवरामेश्वर भजन मंडळ आदी मंडळींनी सुश्राव्य भजन गायनाने रंगत आणली होती. मध्यरात्री नंतर उशिरा पालखीत विराजित
पंचमुखी महादेवाच्या मूर्तीची मंदिराभोवती ‘हर हर महादेव च्या जयघोषात सोमसूत्री प्रदक्षिणा घालण्यात आली. आतिषबाजी व तोफेच्या सलामीने सुरू झालेल्या पालखीला हजारो भाविक उपस्थित होते. देवस्थानच्या रामनवमी उत्सव सांगता सोहळ्यात शाही थाटातील पंचमुखी महादेवाची पालखी मिरवणूक लक्षवेधी ठरली. या पालखी सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित होते. या उत्सवात गुढीपाडव्या पासून बाल कलाकारांसह तरुण ज्येष्ठांनीही तलवारबाजी, लाठीकाठी,मलखांब आदी मर्दानी खेळ पालखी समोर सादर करत रंगत आणली होती. पालखीनंतर उत्सवाच्या सांगतेचे कीर्तन रंगले. पहाटे कीर्तन आटोपल्यानंतर श्रींच्या पंचारतीबरोबर रघुपतीच्या दहा आरत्या एकाचवेळी बाहेर पडत श्री देव रामेश्वरच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आल्या. उत्सव सुरक्षितपणे पार पडावा म्हणून देवस्थान कमिटी, आचरा पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली. या उत्सवात अनेक गायक वादकांनी आपल्या कलेने रसिकांना मंत्रमुग्ध केले होते.

error: Content is protected !!