तळवडे येथील ‘त्या’ प्रकाराबाबत अनिसने वेधले पोलिसांचे लक्ष

अपक्ष महिला उमेदवाराच्या माहिती पत्रकावर ‘जादूटोणा’
जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाईची अनिसची मागणी
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावात निवडणूक काळात एका महिला अपक्ष उमेदवाराच्या निवडणूक माहिती पत्रकावर जादूटोणा करत गावाच्या स्थानिक स्मशानभूमीत ‘वस्तू’ ठेवण्याचा प्रकार सिंधुदुर्ग जिल्हा अंधश्रध्दा निर्मूलन समितीने उघडकीस आणला आहे. अनिसने याबाबत सावंतवाडी पोलिस निरीक्षक यांचे लक्ष वेधत निवेदनाद्वारे या घटनेचा जाहिर निषेध व्यक्त केला आहे. संबंधितांवर जादूटोणा कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड राजीव बिले यांनी केली. आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सचिव प्राध्यापक अजित कानशिडे, रूपाली पाटील (वेंगुर्ला), ॲड उत्तम कदम आदी पदाधिकारी-सदस्य उपस्थित होते.
सावंतवाडी पोलिस हद्दीमध्ये गाव तळवडे या गावामध्ये जिल्हा परीषद पंचायत समिती निवडणुकीच्या काळात अंधश्रद्धा वाढीस लावणाऱ्या घटना घडलेल्या आहेत. या दरम्यान गावातील एका अपक्ष महिला उमेदवाराच्या माहीतीपत्रकामध्ये लिंबू, मिरच्या, नारळ आदी वस्तु गुंडाळून करणी सदृश्य प्रकार कोणितरी अज्ञात इसमाने केलेला आहे. आणि या सगळ्या वस्तु गावाच्या स्थानिक स्मशानभुमीमध्ये ठेवण्या आल्या होत्या. सुशिक्षित सावंतवाडी विभागाला हा प्रकार काळीमा लावणारा आहे. हा प्रकार अंधश्रद्धेतुन निर्माण झालेला असला तरीसुद्धा या प्रकाराने गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे, असे सामाजिक माध्यामानी प्रसिद्ध केलेले आहे असे समजते.
हा प्रकार हा अंधश्रद्धेचा प्रकार असून करणी किंवा तत्सम प्रकार अस्तित्वात नाही यावर आमच्या समितीचा विश्वास आहे. असे अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग च्या निवेदनात म्हटले आहे.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात असेही म्हटले की गावात भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि त्यामुळे या घटनेचा तपास होणे आवश्यक आहे असे वाटते. आपण एक कर्तव्य दक्ष पोलिस अधिकारी आहात. त्यामुळे या अंधश्रद्धेचा तपास आपण करावा असे वाटते. एक सामाजिक जबाबदारी म्हणुन अंधश्रद्धा निर्मुलन समिती आपल्या बरोबर आहे. आवश्यक तर करणी किंवा तत्सम प्रकाराबाबत शास्त्रोक्त माहिती परिसंवाद, प्रयोग, चर्चा, भाषण, मार्गदर्शन आदि सहकार्य देणेस आम्ही तयार आहोत.
गाव तळवडे येथे घडलेल्या या घटनेचा आमची समिती जाहीर निषेध करत आहे. आणि आपण या घटनेचा आवश्यक तो तपास करावा अशी विनंती आपणास करणेत येत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान या घटनेबाबत पोलिस कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





