शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंचाची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

निमंत्रक संपत देसाई यांची कुडाळमध्ये पत्रकार परिषद

शाळा वाचविण्यातही २ ऑक्टोबरला आझाद मैदानात बेमुदत धरणे

शिक्षण व्यवस्थेतील वाढती विषमता, सरकारी शाळांवरील संकट आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या परिणामांविरोधात ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’ यांच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येणार आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून २ ऑक्टोबर २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंचाचे निमंत्रक संपत देसाई, तसेच संजय वेतुरेकर, अंकुश कदम यांनी दिली. कुडाळ येथे ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’ यांच्यावतीने मुंबईत २ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आज ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये सिंधुदुर्गातील या आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची माही देण्यासाठी आज येथील मराठा समाज हॉल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’चे निमंत्रक संपत देसाई, तसेच सदस्य संजय वेतुरेकर, अंकुश कदम, सोमकांत परुळेकर (सावंतवाडी), प्रशांत आडेलकर (कुडाळ), सागर फाळके (देवगड), विद्यार्थी प्रतिनिधी फीझा मकानदार (सावंतवाडी), गुणाजी गवस (दोडामार्ग), राजेंद्र कांबळी, महेश पेडणेकर (सावंतवाडी), संतोष तेंडोलकर (वेंगुर्ले) आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संपत देसाई म्हणाले, शिक्षणाच्या प्रश्नांवर गंभीरपणे विचार करणारे सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी तसेच राज्यभरातील सजग नागरिकांची व्यापक बैठक १६ ऑगस्ट २०२४ रोजी पुणे येथे झाली होती. या बैठकीला नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड, मुंबई, पुणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दीडशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत सरकारी व अनुदानित माध्यमिक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच एकंदरीत शिक्षण व्यवस्थेवर नवीन शैक्षणिक धोरणामुळे होणाऱ्या परिणामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिक्षणाची दुरवस्था आणि या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यपातळीवर व्यापक जनआंदोलन व प्रबोधनाची चळवळ उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनाच्या तयारीसाठी राज्यभर जिल्हानिहाय व विभागनिहाय परिषदा, सभा आणि बैठका घेऊन नवीन शैक्षणिक धोरणाचे संभाव्य परिणाम जनतेसमोर मांडण्यात येणार आहेत.
मंचाच्या प्रमुख मागण्यांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या असल्याच्या कारणावरून शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घेणे, ‘गाव, तांडा, वाडी, वस्ती तिथे शाळा’ हे धोरण कायम ठेवणे आणि एक विद्यार्थी असला तरी शाळा सुरू ठेवणे यांचा समावेश आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
तसेच, गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम करणारा १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, शाळा व महाविद्यालयातील प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मंचाने केली आहे.
नवीन शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षणाचे खासगीकरण व बाजारीकरण वाढण्याची भीती व्यक्त करताना, १००० विद्यार्थी संख्येची अट ग्रामीण व छोट्या शहरांमधील महाविद्यालयांसाठी अडचणीची ठरणार असल्याचे मंचाचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामीण, दलित, आदिवासी, बहुजन-कष्टकरी, भटके-विमुक्त आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून दूर जाण्याची शक्यता असल्याने नवीन शैक्षणिक धोरण रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे, असे संपत देसाई यांनी सांगितले.
संजय वेतुरेकर म्हणाले, केजी ते पीजी सर्वांना मोफत, गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण मिळावे, तसेच शिक्षणावरील सरकारी खर्च वाढवत राष्ट्रीय उत्पन्नाच्या दहा टक्क्यांपर्यंत नेण्यात यावा, या दीर्घकालीन धोरणात्मक मागण्याही मंचाने पुढे केल्या आहेत.
अंकुश कदम म्हणाले, या आंदोलनाला व्यापक जनसमर्थन मिळवण्यासाठी पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षण संस्था, शिक्षणाच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संस्था-संघटना, डाव्या-पुरोगामी-प्रागतिक चळवळी आणि सजग नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हे आंदोलन मुंबईत जरी होणार असले तरी त्याचवेळी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात, शाळेसमोर हे धरणे आंदोलन होणार असल्याची महती यावेळी देण्यात आली.

error: Content is protected !!