कुडाळ शहरातील खड्डे दोन दिवसांत बुजविणार; नवीन ब्रिजवर रेलिंगचीही मागणी

अभिषेक गावडे यांच्या निवेदनाची प्रशासनाकडून तातडीने दखल

गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुरक्षित करण्याचे आश्वासन

कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांवर पडलेले धोकादायक खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, या मागणीसाठी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देत आक्रमक भूमिका घेतली. या निवेदनाची प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून, दोन दिवसांत खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करून ते पूर्ण करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे.
कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कविलकट्टा, रेल्वे स्थानक रस्ता तसेच नाबरवाडी परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
येत्या काही दिवसांत गणेशोत्सव सुरू होत असून, या काळात शहरातील नागरिक तसेच वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित व सुस्थितीत करावेत, अशी मागणी गावडे यांनी केली.
या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. दोन दिवसांच्या आत खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करून ते पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, कुडाळ रेल्वे स्थानक ते आंबेडकरनगर या मार्गावरील नवीन ब्रिजवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने रेलिंग बसविण्यात यावे, अशी मागणीही अभिषेक गावडे यांनी केली आहे. या ठिकाणी सध्या रेलिंग नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतही तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
“गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे आवश्यक आहे. नागरिकांना सुरक्षित आणि चांगले रस्ते मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. दोन दिवसांत खड्डे बुजविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. दिलेल्या मुदतीत काम झाले नाही तर शिवसेना पक्षाच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल,” असा इशारा अभिषेक गावडे यांनी दिला.
यावेळी शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, उपशहरप्रमुख चेतन पडते, प्रथमेश केळबाईकर, युवा सेना शहरप्रमुख आबा धडाम, युवा सेना उपशहरप्रमुख प्रथमेश कांबळी, अजिंक्य नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!