कुडाळात मोकाट जनावरांच्या गळ्यात ‘रिफ्लेक्शन पट्टे’

मंदार शिरसाट यांची अपघात रोखण्यासाठी अनोखी मोहीम

स्तुत्य उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद

रात्रीच्या अंधारात रस्त्यावर फिरणाऱ्या अथवा बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी कुडाळमध्ये एक अनोखा आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. ‘सुरक्षित कुडाळ, अपघातमुक्त कुडाळ’ या संकल्पनेतून २५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता शहरातील सुमारे १४ मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियमचे ‘रिफ्लेक्शन पट्टे’ बांधण्यात आले.
कुडाळचे नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या पुढाकाराने आणि सौजन्याने ही विशेष मोहीम राबविण्यात आली. रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली जनावरे वाहनचालकांना अंधारामुळे वेळेत दिसत नसल्याने अनेकदा गंभीर अपघात घडतात. ही समस्या लक्षात घेऊन जनावरांच्या गळ्यात लावण्यात आलेले रिफ्लेक्शन पट्टे वाहनांच्या प्रकाशात दुरूनच चमकणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जनावरे वेळीच दिसून संभाव्य अपघात टाळण्यास मदत होणार आहे.
यावेळी बोलताना नगरसेवक मंदार शिरसाट म्हणाले, “हा एक छोटासा प्रयत्न असला तरी यामुळे मुक्या प्राण्यांसह वाहनचालकांचे मौल्यवान प्राण वाचविण्यास मोठी मदत होईल. ‘एक छोटासा प्रयत्न, अनेक जीवांचे संरक्षण’ या भावनेतून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे.”
रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असून, मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी कुडाळमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचे नागरिक आणि वाहनचालकांकडून कौतुक होत आहे.
या मोहिमेत नगरसेवक मंदार शिरसाट, नगरसेवक संतोष शिरसाट, सुशिल चिंदरकर, नितीन सावंत, सतीश कुडाळकर, केदार काळाप, भूषण कुडाळकर, संदीप म्हाडेश्वर, यश मोहिते, दीपक भोगटे, अमित राणे, मंदार चंद्रकांत शिरसाठ, रोहन काणेकर, शैलेश काळाप, दिनार शिरसाठ यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते, तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
‘मोकाट जनावरांना रिफ्लेक्शन पट्टे; अपघात टाळण्यासाठी कुडाळमध्ये अनोखी शक्कल!’ हा उपक्रम सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.

error: Content is protected !!