कळसुली तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी श्री.विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड.

कणकवली : मयूर ठाकूर तालुक्यातील कळसुली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री.विठ्ठल चव्हाण यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीने ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.श्री.विठ्ठल चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून,‘रक्तमित्र’ म्हणूनही त्यांची विशेष ओळख आहे.गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यापासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने पुढाकार घेत असतात.सामाजिक कार्यासोबतच सांस्कृतिक,धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.गावातील सामाजिक सलोखा,परस्पर सहकार्य आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून गावातील वाद-विवाद संवादाच्या माध्यमातून सामोपचाराने सोडविणे,ग्रामस्थांमध्ये सलोखा निर्माण करणे आणि गावात शांततामय वातावरण टिकविणे ही महत्त्वाची जबाबदारी असते.या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या विठ्ठल चव्हाण यांची निवड कळसुली गावच्या सामाजिक एकोप्याला निश्चितच नवी दिशा देणारी ठरेल,अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. तंटामुक्ती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री.विठ्ठल चव्हाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.






