कुडाळ पोलिसांकडून ‘एक राखी सुरक्षेची’ !

सुरक्षित प्रवासाचे नागरिकांना आवाहन

हातात सुरक्षा धागा बांधून पोलिसांनी जपली बांधिलकी

“राखीच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी” हा संदेश जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आज रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून कुडाळ पोलिसांनी शहरात ‘एक राखी सुरक्षेची’ अभियान राबविले. रस्ता सुरक्षेचे नियम पाळून वाहन चालवा असा संदेश या अभियानातून वाहनचालकांना देण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हाभर हे अभियान राबवण्यात आले. कुडाळ पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या अभियानाबद्दल नागरीकातून समाधान व्यक्त करण्यात आले.
आज रक्षाबंधन. भावाने बहिणीचे रक्षण करायचे असा संदेश मनगटावर राखी बांधून या सणातून दिला जातो. पण वाहतुकीचे नियम पाळले तर आपलं सुद्धा आपण रक्षण करू शकतो. हाच धागा पडकून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या संकल्पनेतून कुडाळ पोलिसांनी हा ‘एक राखी सुरक्षेची’ ऊपक्रम राबविला. कुडाळ पोस्ट ऑफिस चौक येथे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कुडाळ पोलिसांकडून वाहनचालकांना राख्या बांधून सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृती करण्यात आली. एसटी बस चालक, रिक्षाचालक, दुचाकी चारचाकी चालक, पत्रकार यांना सुरक्षा राखी बांधण्यात आली. कुडाळ बस स्थानकावर असलेल्या रिक्षा चालकांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिसांनी रक्षेचा धागा आणि रस्ते सुरक्षेचा संदेश यांची सांगड घालत नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाच्या माध्यमातून हेल्मेटचा वापर, सीट बेल्टचा वापर, वाहन चालविताना वेगावर नियंत्रण, मद्यपान करून वाहन न चालविणे, मोबाईल फोनचा वापर टाळणे तसेच रस्त्यावर स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेची काळजी घेणे याबाबत वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात आले. केवळ नियम आहेत म्हणून पाळू नका तर हे नियम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेले असतात याची जाणीव ठेवा. वाहतुकीचे नियम पाळा असे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी केले.
पोस्ट कार्यालय चौकाबरोबरच कुडाळ बस स्थानक माझं कुडाळ सेल्फी पॉईंट आणि एसआरएम कॉलेज जवळ एस एन देसाई चौक येथे सुद्धा हा उपक्रम राबवून वाहनचालकांना सुरक्षेची राखी बांधण्यात आली. यावेळी कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे, अंमलदार प्रमोद काळसेकर, ममता जाधव, वाहतूक पोलीस ज्योती रायशिरोडकर, शाम भगत, सिद्धेश चिपकर, संदीप वराडकर, महेश जळवी, वेदिका गावडे, अनिरुद्ध सावर्डे, तसेच साई जळवी फिल्म्स टीमचे साई जळवी, ऋचा शिर्के, नेहा चव्हाण, ओंकार पालव आदी उपस्थित होते.वहाने सावकाश चालवा सुरक्षित राहा कारण घरी कोणीतरी आपली जवळची माणसं वाट पाहत असतात, असा एक भावनिक संदेश आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलीस बांधवांकडून नागरिकांना देदेण्यात आला आणि नागरिकांनी सुद्धा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!