कुडाळच्या बँकेत ३३ लाखांची जबरी चोरी

महिला कर्मचाऱ्याच्या मानेवर चाकू ठेवून ओलीस
नागरिक आणि व्यावसायिकांच्या सतर्कतेमुळे संचयित ताब्यात
कुडाळ शहरातील पानबाजार परिसरातील एका बँकेत भरदिवसा चाकूचा धाक दाखवून ३३ लाख रुपयांची जबरी चोरी झाल्याची घटना घडली. बँकेत प्रवेश करताच संशयित भक्तराज वासुदेव सडवेलकर (२८, रा. पिंगुळी-काळेपाणी) याने महिला कर्मचाऱ्याच्या मानेवर चाकू ठेवून तिला ओलीस धरले. त्यानंतर धमकावून कॅश काउंटरवरील तब्बल ३३ लाख रुपयांची रोकड पिशवीत भरून घेतली. मात्र, नागरिक आणि व्यावसायिकांच्या सतर्कतेमुळे संशयिताला पकडण्यात आले. त्यामुळे लुटलेली संपूर्ण रक्कम पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली.
बँकेची कर्मचारी सोनाली सागर जळवी (३८) यांनी दिलेल्या तक्रारवजा जबाबानुसार, संशयित भक्तराज सडवेलकर याने बँकेत प्रवेश करताच त्यांच्या मानेवर चाकू ठेवला. ‘ओरडायचे नाही, ओरडलात तर मारून टाकीन,’ अशी धमकी देत त्यांना पुढे नेले. त्यानंतर सौ. हर्षल गवंडे यांच्या कॅश काउंटरवर नेऊन हिंदी भाषेत उपचारासाठी पैसे हवे असल्याचे सांगितले. चाकूचा धाक दाखवून काउंटरवरील तब्बल ३३ लाख रुपयांची रोकड त्यांच्याकडून पिशवीत भरून घेतली.
या घटनेमुळे बँकेत एकच खळबळ उडाली. दरम्यान, संशयिताने रोकड घेऊन पळण्याचा प्रयत्न केला असता नागरिक आणि व्यावसायिकांनी प्रसंगावधान राखत त्याला पकडले. संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.
या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी भक्तराज वासुदेव सडवेलकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ३३ लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली असून तिची मोजदाद करून पंचनामा केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विकास बडवे आणि उपनिरीक्षक प्रमोद काळसेकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या नेतृत्वाखाली PSI सावर्डे, PSI पाडावे, WPSI कदम, ASI कोळेकर, HC केसरकर, HC परुळेकर, HC भोई, Hc गायतोंडे, PN चव्हाण, WPC भागवत तपास करत आहेत.






