दिवाळीत किल्ले साकारणाऱ्या बाल मावळ्यांचा रायगडावरून गौरव

श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचा अनोखा उपक्रम

सहभागी प्रत्येक बाल मावळ्याला मिळणार सन्मानपत्र

दिवाळीनिमित्त राज्यभरात किल्ले बनवणाऱ्या बाल मावळ्यांचा सन्मान होणार आहे. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांचा अनोखा उपक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली.
श्री. पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि हिंदवी स्वराज्याच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणारे गडदुर्ग दिवाळीनिमित्त बाल मावळ्यांकडून मोठ्या उत्साहात साकारले जातात. या माध्यमातून ऐतिहासिक वारशाचे जतन आणि शिवचरित्राचा प्रसार करणाऱ्या बाल मावळ्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने विशेष गौरव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सहभागी होण्यासाठी बाल मावळ्यांनी आपल्या साकारलेल्या गडदुर्गाचा फोटो किंवा व्हिडीओ (रील) Instagram वर पोस्ट करून समितीच्या
@rajyabhishek या अधिकृत Instagram खात्याला Collab करणे आवश्यक आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी फोटो व व्हिडीओ पाठविण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर २०२६ आहे.
या उपक्रमासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई या संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. आपल्या परिसरात, गावात किंवा परिचयातील लहान मुलांनी दिवाळीनिमित्त किल्ला साकारला असल्यास त्यांच्या पालकांनी त्यांना या उपक्रमाची माहिती देऊन सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी राहुल मांडवकर , दर्शन चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शिवचरित्राचा प्रसार आणि ऐतिहासिक वारशाचे जतन

समितीच्या वतीने गेली ३२ वर्षे किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाविषयी माहिती देताना समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पवार म्हणाले की, “हा उपक्रम कोणतीही स्पर्धा नसून शिवचरित्राचा प्रसार आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करणाऱ्या बाल मावळ्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा एक प्रयत्न आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक बाल मावळ्याला समितीतर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल, शिवचरित्राबद्दल आणि गडकोटांच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल आदर निर्माण होईल. तसेच त्यांना या इतिहासाचा अभ्यास करण्याची व त्यांना जतन करण्याची प्रेरणा मिळेल.”

error: Content is protected !!