आशियेत गडनदीपात्रातील कच्च्या बंधाऱ्यामुळे जलसंधारण होईल

उपसभापती सोनु सावंत यांचे प्रतिपादन

आशिये ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गडनदी पात्रात कच्च्या बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ; आशियेसह परिसरातील गावांना होणार लाभ

महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ट्रिगर वनमध्ये घोषित करण्यात आले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनानंतर संपूर्ण जिल्ह्यात लोकसहभागातून, स्वखर्चाने तसेच ग्रामपंचायती आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वनराई व कच्चे बंधारे उभारण्यात येत आहेत. कणकवली तालुक्यात जवळपास दोन हजार वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. त्यादृष्टीने आशिये ग्रामपंचायत सरपंच महेश गुरव यांच्या पुढाकाराने गडनदीपात्रात होणारा हा बंधारा जलसंधारणासाठी महत्वपूर्ण ठरेल , असा विश्वास कणकवली पंचायत समितीचे उपसभापती सोनु सावंत यांनी व्यक्त केला.
आशिये ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष भगवान लोके यांच्या सहकार्याने बानेवाडी गणपती साना गडनदी पात्रात कच्चा बंधारा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ पंचायत समितीचे उपसभापती सोनू सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी सरपंच महेश गुरव, उपसरपंच संदीप जाधव,जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष भगवान लोके ,पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे, माजी सरपंच शंकर गुरव,पांडुरंग बाणे, बुध अध्यक्ष सचिन गुरव, पत्रकार संजय बाणे ,सुनिल बाणे, प्रविण ठाकुर ,समीर ठाकुर, किशोर बाणे , दिगंबर वर्दम,ग्रामविकास अधिकारी राकेश गोळवणकर, भरत तळवडेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थि होते.

उपसभापती सोनू सावंत म्हणाले, आशिये ग्रामपंचायतीने लोकसहभागातून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बानेवाडी गणपती साना गडनदी पात्रात बंधारा उभारण्याचे काम हाती घेतले आहे. हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. या बंधाऱ्याचा लाभ केवळ आशिये गावालाच नव्हे, तर वागदे, सातरल, कासरल आदी पंचक्रोशीतील गावांनाही होणार आहे. बंधाऱ्यात पाणी साठल्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने आगामी काळात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या बंधाऱ्याचा परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल.

सरपंच महेश गुरव म्हणाले, आशिये ग्रामपंचायतीच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी बंधारा उभारण्यात येतो. या बंधाऱ्याचा फायदा आशियेबरोबरच वागदे, सातरल आणि कासरल या पंचक्रोशीतील गावांना होत आहे. या बंधाऱ्यामुळे आशिये गावची नळपाणी योजनेची विहिर लगतच आहे. त्यामुळे संपुर्ण गावाला याचा फायदा होईल. पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः विविध ठिकाणी श्रमदान करून जलसंधारणाच्या कामांना प्रोत्साहन दिले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आमचीही ही जबाबदारी असून, त्याच भावनेतून ग्रामपंचायतीने बंधाऱ्याचे काम हाती घेतले आहे.
यावेळी या बंधाऱ्याच्या कामासाठी आलेल्या सर्वांचे ग्रामविकास अधिकारी राकेश गोळवणकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!