ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचा कुडाळात मोर्चा

प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांना विविध मागण्यांचे निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज कुडाळ येथील प्रांत अधिकारी व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनानंतर प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदानाच्या आकडेवारीबाबत प्रश्न उपस्थित केले. मतदानाची आकडेवारी संशयास्पदरीत्या वाढल्याचा दावा करत, निवडणूक प्रक्रियेबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीदरम्यान पैसे वाटप झाल्याचे व्हिडीओ प्रसारित झाले होते, मात्र त्यावर अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. एस.आर.आय. प्रणालीबाबतही तक्रार करण्यात आल्याचे सांगत, आगामी निवडणुका निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी नाईक यांनी केली.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत बोलताना नाईक यांनी सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. मात्र, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी दोन लाख रुपयांची मदत मागितली होती; मात्र शासनाकडून हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. जलजीवन मिशनची कामे पूर्ण न झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांबाबतही नाईक यांनी प्रश्न उपस्थित केले. खोट्या दाखल्यांच्या आधारे परप्रांतीयांकडून जमिनी खरेदी केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सासोली येथील वृक्षतोड प्रकरणात कारवाई न झाल्याचा दावा करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही टीका केली. पिंगुळी पाझर तलाव परिसरातील जमिनींचे प्लॉट पाडून विक्री होत असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
या मोर्चात महाविकास आघाडी तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाळा पावसकर, अमरसेन सावंत, राजन नाईक, कृष्णा धुरी, बबन बोभाटे, अमित राणे, मंदार शिरसाट, बाळा कोरगावकर, संतोष शिरसाट, अभय शिरसाट, बाळा कनायाळकर, विजय प्रभू, अशपाक कुडाळकर, मंगेश बांदेकर, दीपक आंगणे, सागर भोगटे, शैलेश काळप, संदीप म्हाडेश्वर, सुशील चिंदरकर, एकनाथ धुरी, ममता राऊळ, अवधूत मालंडकर, दीपक धुरी, नीलम पालव, गंगाराम सडवेलकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!