SIR प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फीची मागणी

विशेष सखोल पुनरावृत्ती अर्थात SIR प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना लेखी निवेदन देण्यात आले. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.
भारतीय लोकशाहीत निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्षपणे पार पाडणे ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी आहे. मात्र, SIR प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा दावा काँग्रेसने निवेदनातून केला आहे.
द इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा संदर्भ देत काँग्रेसने म्हटले आहे की, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत किमान १४ वेळा निवडणूक आयोगाच्या काही निर्णयांवर लेखी आक्षेप नोंदवले. या आक्षेपांमध्ये नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे, Form-6 मधील बदल तसेच मतदार यादीच्या IT प्रणालीच्या केंद्रीकरणाशी संबंधित मुद्द्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, SIRच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली जात असून, ही प्रक्रिया लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक आहे. पश्चिम बंगाल आणि बिहारमधील मतदार यादीतील बदलांचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यापूर्वी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेबाबत प्रश्न उपस्थित केल्याचे काँग्रेसने नमूद केले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी त्यांना पदावरून दूर करून अटक करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या स्पष्टीकरणात SIRशी संबंधित निर्णय हे मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांच्या सहमतीने घेतले असल्याचे म्हटले आहे.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. यावेळी उपाध्यक्ष नागेश मौरये, मेघनाद धुरी, अनिल डेंगवेकर, विजय प्रभू, वासुदेव नाईक, जिल्हा सरचिटणीस देवानंद लुडबे, प्रवीण वरूनकर, मधुकर लुडबे, सुभाष दळवी, बाळू मेस्त्री, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांच्यासह राजेंद्र कदम, सुगंधा साटम, महेश अंधारी, प्रवीण आचरेकर, अजिंक्य गावडे, तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, अभय मालवणकर, जेम्स फर्नांडिस, अभय शिरसाठ, वैभव वेंगुर्लेकर, प्रीती बांदेकर, सच्चीदानंद बुगडे, सरदार ताजर, बाळा शिरोडकर, निलेश मालंडकर, महेश परब, बाबाजी पांचाळ, अहमद बोबडे, सोनल सावंत, दिलशाद बोबडे, अमृत राऊळ, तरबेज शेख, लक्ष्मण शिरोडकर, सुशील बांदेकर, प्रदीप चौगुले, उमेश मोंडकर, रेवडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!