कणकवली रिक्षा चालक-मालक संघटने चे काम समाजाभिमुख

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रतिपादन

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे केले आवाहन

एकांकिका ते चित्रपट असा प्रवास करणाऱ्या कणकवलीतील सिने अभिनेत्यांचा सत्कार

कणकवली मधील रिक्षा चालक-मालक संघटने चे पदाधिकारी व कार्यकर्ते हे गेले अनेक वर्ष शहरात प्रामाणिकपणे व्यावसाय करत आहेत. रात्री अपरात्री प्रवाशांना सोडताना त्यांना या रिक्षा चालक-मालक यांच्याकडून नेहमीच सुरक्षितेची ही भावना वाटत आली आहे. या संघटनेने गणेशोत्सव साजरा करत असताना सामाजिक दृष्ट्या देखील आपली जबाबदारी जपली आहे असे प्रतिपादन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. तसेच राज्यात दुष्काळी स्थिती असताना आपल्याला आता कणकवली मध्ये देखील या स्थितीचा सामना येत्या काळात करावा लागणार आहे. त्यामुळे सर्वात मोठा पाणी प्रश्न असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाणी आतापासूनच जपून वापरा असे आवाहन देखील श्री नलावडे यांनी केले. रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवात श्री नलावडे सपत्नीक सहभागी झाले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रिक्षा चालक-मालक संघटनेच्या गणपतीची आरती देखील करण्यात आली. यावेळी कणकवली नगरपंचायत च्या विरोधी गटनेत्या सुप्रिया नलावडे, राज नलावडे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, बाळा वराडकर, संतोष सावंत आदी उपस्थित होते. तसेच यावेळी संघटनेच्या वतीने एकांकिका ते अभिनेता असा प्रवास करणाऱ्या अभिनेते विवेक वाळके, सुहास वरुणकर, अभय खडपकर, संजय मलडकर यांचा समीर नलावडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सर्व कलाकारांनी एकांकिका मध्ये आपल्या अभिनयाची सुरुवात करून नाटक व चित्रपट अशी चढता आलेख घेऊन आपल्या अनेक भूमिका साकारल्या. कणकवलीकर म्हणून त्यांचा सर्वांनाच अभिमान असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच राज्यात दुष्काळी स्थिती जाहीर झाली असून, आपला तालुका देखील दुष्काळी स्थितीच्या पहिल्या निकषात बसला आहे. त्यामुळे भविष्यात पाणी प्रश्नाचा आपल्याला मोठा सामना करावा लागणार आहे. प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर आतापासून करण्याची गरज आहे. पाणी अडवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपण प्रत्येकाने जबाबदारी उचलली तर सामूहिकरीत्या दुष्काळावर मात करणे सोपे जाईल असे देखील आवाहन श्री नलावडे यांनी केले. रिक्षा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी शिबिर हे सध्याच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. आजच्या घडीला आरोग्य सुरक्षित असले तरच आपण सर्व बाबतीत समाजाची सेवा करू शकतो. त्यामुळे आरोग्य तपासणीच्या माध्यमातून रिक्षा चालक-मालक संघटनेने देखील एक चांगला आदर्श समाजासमोर घालून दिला आहे. कणकवली रिक्षाचालक-मालक संघटना ही नेहमीच प्रत्येक सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते. त्यामुळे अशा संघटनेच्या बाबतीत कणकवलीकर म्हणून आम्हाला देखील अभिमान असल्याचे श्री नलावडे यांनी सांगितले.

error: Content is protected !!