सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची आणि गौरवाची बातमी…

मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ आणि श्रमिक विद्यार्थी ज्ञान सेवा संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांची संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूरच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यपदी अभिनंदनीय निवड झाली आहे.
गेली अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल या निवडीच्या माध्यमातून घेतली गेली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर काम करत असताना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्न आणि विद्यार्थीहिताच्या विषयांवर सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर सावंतवाडीच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जडणघडणीतही त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे.
मुंबई विद्यापीठाचे बेस्ट कॉलेज, नॅकची ‘ए’ श्रेणी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले स्वायत्त महाविद्यालय आणि लीड कॉलेज असा बहुमान मिळवणाऱ्या या महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.
बदलत्या काळानुसार पारंपरिक कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसोबतच आयटी, कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारखे आधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या बदलत्या चौकटीत विद्यार्थ्यांना आधुनिक आणि रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या युवराज लखमसावंत भोंसले यांच्या कार्याची दखल आता संजय घोडावत विद्यापीठाच्या गव्हर्निंग कौन्सिलवरील निवडीने घेतली गेली आहे.
दरम्यान, त्यांच्या या निवडीबद्दल श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी पुष्पगुच्छ देऊन युवराज लखमसावंत भोंसले यांचा सत्कार केला.
यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य जयप्रकाश सावंत आणि डॉ. सतीश सावंत, संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहाय्यक संचालक अॅड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, श्री पंचम खेमराज लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अश्विनी लेले, मदर क्वीन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल… आणि त्यातून मिळालेली नवी जबाबदारी…
युवराज लखमसावंत भोंसले यांच्या या निवडीमुळे सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.






