मुक्ताई ॲकॅडमीच्या पाच बुद्धिबळपटूंची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

साक्षी, गार्गी, आहना, चिदानंद आणि लिएण्डर यांची सांगली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे कणकवली येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करणाऱ्या ॲकॅडमीच्या साक्षी रामदूरकर, गार्गी सावंत, आहना पालव, चिदानंद रेडकर आणि लिएण्डर पिंटो या पाच विद्यार्थ्यांची सांगली येथे होणाऱ्या विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१७ वर्षांखालील गटात साक्षी रामदूरकर हिने तिसरा क्रमांक मिळवत सलग पाचव्या वर्षी विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान मिळवला. १४ वर्षांखालील गटात आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू गार्गी सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावत सलग तिसऱ्या वर्षी विभागस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला. आपल्या गटात गार्गीने सलग तीन वर्षे अव्वल कामगिरी केली आहे.
कुडाळ येथील आहना पालव आणि लिएण्डर पिंटो यांनी पहिल्याच सहभागात १४ वर्षांखालील गटात द्वितीय क्रमांक मिळवला. आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू चिदानंद रेडकर याने याच गटात तृतीय क्रमांक पटकावला.
मुक्ताई ॲकॅडमीच्या अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय बुद्धिबळपटू व प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. ॲकॅडमीच्या सरचिटणीस सौ. स्नेहा पेडणेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
गेल्या दहा वर्षांत मुक्ताई ॲकॅडमीच्या अनेक विद्यार्थ्यांनी शालेय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये विभाग आणि राज्यस्तरावर निवड मिळवली असून, ॲकॅडमीच्या या कामगिरीचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.






