संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ न.पं. जलसंधारणासाठी तत्पर

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडून बंधारे व जलस्रोतांची पाहणी

‘पाणी अडवा, पाणी वाचवा’चे आवाहन

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीने जलसंधारणाच्या उपाययोजनांना सुरुवात केली आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २७ सप्टेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीतील सूचनांची तातडीने दखल घेत नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी शहरातील उपलब्ध बंधारे आणि अन्य जलस्रोतांची पाहणी केली. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, अधिकारी तसेच नगरसेविका सौ. नयना मांजरेकर उपस्थित होत्या.
पावसाचे पाणी वाहून न जाता जास्तीत जास्त पाणी अडवणे, साठवणे आणि जमिनीत मुरवणे यासाठी शहरातील योग्य ठिकाणी छोटे बंधारे उभारण्यासह दगड-मातीच्या माध्यमातून पाणी अडविण्याच्या उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या सूचना नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आल्या. उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, नैसर्गिक पाण्याचा प्रवाह नियंत्रित करून भूजल पुनर्भरणाला चालना देण्यावरही भर देण्यात आला.
या छोट्या जलसंधारण उपाययोजनांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून विहिरी आणि भूजलसाठा वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.
“परतीचा पाऊस अजून बाकी आहे… पाणी अडवूया, पाणी वाचवूया! प्रत्येक वाडी, प्रत्येक ओढा आणि प्रत्येक योग्य ठिकाणी एक छोटा बंधारा उभारूया,” असे आवाहन सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी केले. नागरिकांनी ओढे, नाले आणि जलस्रोत स्वच्छ ठेवून पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा, असेही त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!