शाळा म्हणजे विद्यार्थ्यांमधील कला गुणांना प्रकाशात आणणारे ज्ञानमंदिर : केतकी भावे- जोशी

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत घुमले स्वरा आणि केतकी जोशी यांचे स्वर
कुडाळ : शाळा या विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रकाशात आणणारी ज्ञानमंदिरे आहेत. विद्यार्थीदशेतच विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांतील कलागुण पारखता येतात. त्यासाठी शिक्षकांची सकारात्मक भूमिका व पालकांचा पाठिंबा आणि त्यांच्यातील कला गुण व क्षमता ओळखून तिला खतपाणी घालण्याची मानसिकता महत्त्वाची ठरते, असे उद्गार सुप्रसिद्ध गायिका केतकी भावे- जोशी यांनी काढले. प्रजासत्ताक दिनी त्यांच्या हस्ते ध्वजवंदन केल्यानंतर बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध शिक्षणक्रमाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांच्या कन्या सारेगामाप फेम स्वरा जोशी यांच्यासोबत त्यांनी अजरामर देशभक्तीपर व बालगीते सादर केली.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, आपल्यातील कला ओळखून त्यातील परिपूर्ण ज्ञान मिळवून त्याचा सराव करा. ज्यातून उद्याचा एखादा कलाकार घडू शकतो. या दृष्टीने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांची, पालकांची सकारात्मक भूमिका, संस्थेमध्ये मुलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयी- सुविधा याबद्दल समाधान व्यक्त केले. 26 जानेवारी रोजी आपल्या परिवाराला ध्वजवंदनाचा मान दिल्याबद्दल आपण भारावून गेल्याचे सांगून या सन्मानाबद्दल धन्यवाद दिले.
यावेळी त्यांनी आपली कन्या स्वर सोबत काही अजरामर देशभक्तीपर गीत व बालगीत सादर केली. त्यामध्ये “ए मेरे वतन के लोगो…’,हे वतन,मेरे वतन…,’ जयोस्तुते!जयोस्तुते!! श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे…, … तर स्वरा जोशी हीने “रोज रोज करून नुसतीच शाळा…, “ससा तो ससा की कापूस जसा…, “न म्हातारा इतुका.. अवघे पाऊणशे वयमान….,” खंडेरायाच्या लग्नाला बानु नवरी नटली…. नवरी नटली बाई सुपारी फुटली..” अशी हृदयस्पर्शी व बहारदार गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. याला संगीत साथ प्रा.मंदार जोशी व सिद्धेश कुंटे यांनी दिली.
ध्वजवंदन प्रसंगा उपस्थित जोशी परिवाराचे स्वागत आणि अभिनंदन करताना संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी तिच्या आई-वडिलांनी स्वरावर केलेली संस्कार याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “आपण मोठे होतो. त्या मोठेपणाला व्यवहारवादामध्ये न तोलता सामाजिक बांधिलकी सतत जपावी.” असा संदेश दिला. स्वराचे आई-वडील स्वराची ज्या पद्धतीने तिची कला जपत आहेत. केलेल्या प्रयत्नांची त्यागाची जाणीव ठेवा. त्यांचे आभार माना. त्यांना मान द्या. असा सल्लाही दिला.
यावेळी सुप्रसिद्ध गायिका केतकी जोशी यांच्यासोबत त्यांचे पती अभिजीत जोशी, कन्या स्वरा जोशी, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर,अमृता गाळवणकर, कल्पना भंडारी, चैताली बांदेकर, पल्लवी कामत, अरुण मर्गज, इत्यादी उपस्थित होते.





