कुडाळात बाजारपेठेतुन ५८ हजाराचा अवैध गुटखा जप्त

कुडाळ पोलिसांची एकावर कारवाई
कुडाळ येथील बाजारपेठेतील दिपाली ट्रेडर्स या दुकानावर कुडाळ पोलिसांनी छापा टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ५८ हजार ८०७ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करून त्याला करण्यात आली आहे.
याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक स्वानील जगन्नाथ चव्हाण यांना विश्वसनीय माहिती मिळाली होती की, कुडाळ बाजारपेठेतील दिपाली ट्रेडर्स या दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेल्या पानमसाल्याची व सुगंधी तंबाखूची विक्रीसाठी साठवणूक करण्यात आली आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक मगदूम यांना कळविण्यात आली. त्यानुसार पंचांच्या उपस्थितीत पोलीस पथकाने छापा टाकला. दुकानात असलेल्या इसमाने आपले नाव सुशील उर्फ दत्ता गुरुनाथ पडते (वय 56, रा. कुडाळ बाजारपेठ) असे सांगितले. झडतीदरम्यान विविध नामांकित कंपन्यांचे पानमसाला व सुगंधी तंबाखूचे पाऊच व डबे मोठ्या प्रमाणात आढळून आले.
या मालाबाबत कोणताही वैध परवाना नसल्याचे आरोपीने कबूल केले. तसेच हा माल सावंतवाडी येथील शेख नावाच्या इसमाकडून (पूर्ण माहिती उपलब्ध नाही) मिळाल्याचेही त्याने सांगितले. पंचासमक्ष सर्व मुद्देमाल जप्त करून नमुने रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 123, 274, 275 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्सपेक्टर गुरुनाथ पाडावे करीत आहेत.





