तुम्हीच तुमची प्रेरणा बना – डॉ. प्रकाश परब

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

शालेय गटात साक्षी साळकर तर कॉलेज गटात रुपेश आळवे विजेते

तुम्हीच तुमची प्रेरणा बना. इतरांची वाट बघू नका. हे स्पर्धेचे जग आहे. त्यात तयारीनिशी भाग घ्या. विजयाची नुसती वाट बघू नका. त्याला प्रयत्नांची जोड द्या. विजयी व्हाल. परिस्थिती प्रयत्नाने व व्यक्ती पुस्तकामुळे बदलू शकते; पण नाथ पै सारखी विचारांची, जीवन मूल्यांची दृष्टी ठेवा. तुम्ही घडाल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य तथा वझे कॉलेज मुंबईचे निवृत्त प्राध्यापक डॉक्टर प्रकाश परब यांनी केले. बॅ. नाथ पै यांच्या 55 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटात साक्षी दत्तात्रय साळकर हिने तर महावियालयीन गटात रुपेश आळवे यांनी पटकावले.
बॅ. नाथ पै यांच्या 55 व्या पुण्यतिथीनिमित्त बॅ. नाथ शिक्षण संस्थेमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. प्रकाश परब यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन झाले. त्यावेळी व्यासपीठावर स्पर्धा परीक्षक सुधाकर वळंजू, सदानंद तावडे, प्रा. नितीन बांबडेकर, स्पर्धा संयोजक प्रा. अरुण मर्गज, नर्सिंग महाराजांच्या प्राचार्य कल्पना भंडारी, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, बी एड प्राचार्य परेश धावडे इत्यादी उपस्थित होते. रुपये २५ हजारांची रोख पारितोषिकं व सन्मानचिन्ह असलेल्या उभा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये शालेय स्तरावर १८ स्पर्धक, तर महाविद्यालयीन स्तरावर २७ स्पर्धक मिळून ४५ स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. परब म्हणाले, लोकनेते, संसदपटू, कोकण भूषण बॅ. नाथ पै यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा वैचारिक वारसा जोपासण्याच्या उद्देशाने आजच्या ज्वलंत विषयावर भरघोष बक्षीस असलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच सुनियोजित आयोजन करणे व या बाबत उत्तम मार्गदर्शन शिक्षण संस्थेकडून होते, ही फार कौतुकास्पद बाब आहे. बॅ. नाथ पै यांच्या विचारांची, त्यांनी जोपासलेल्या जीवन मूल्यांची आजच्या काळात गरज आहे. त्याचा जागर या स्पर्धेच्या निमित्ताने होतो आहे. ही फार समाधानाची बाब आहे. आता वैचारिक परिवर्तनासाठी तरुणाने सज्ज झाले पाहिजे. त्यासाठी आत्मशुद्धीची गरज आहे. त्यातून घसरलेला वैचारिक आणि सांस्कृतिक स्तर उंचावला जाऊ शकतो. त्यासाठी चांगल्या सृजनशील व्यक्तींच्या संपर्कात रहा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
चांगले बोलणे म्हणजे वक्तृत्व नव्हे. तर विषयानुषंगाने प्रभावीपणे मौलिक विचार मांडणे म्हणजे चांगले वक्तृत्व होय. असे सांगत मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे, त्याना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व पालकांचे, अशा स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजक संस्थेचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या चेअरमन उमेश गाळवणकर यांचे डॉ. परब यांनी अभिनंदन केले. बॅ. नाथ पै यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचा निकाल

 शालेय स्तरावर प्रथम क्रमांक कुमारी साक्षी दत्तात्रय साळकर, रोख रु. 4000 व सन्मान चिन्ह (शिवाजी इंग्लिश स्कूल पंणदूर), द्वितीय क्रमांक आरती अवधूत राजाध्यक्ष, रोख रुपये 3000 व सन्मानचिन्ह (आर पी डी कॉलेज सावंतवाडी), तृतीय क्रमांक कु. श्रावणी राजन आरवंदेकर, रोख रुपये  2000 व सन्मान चिन्ह (वेतोरे हायस्कूल वेतोरे) तर उत्तेजनार्थ प्रत्येकी ₹1000 ची दोन बक्षीस कु. प्रणाली पुं. सोनवडेकर (रामेश्वर विद्यामंदिर, बाव) व निरंजन अजय कुशे (बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ) यांनी गुणांनुक्रम संपादन केला.
   महाविद्यालयीन स्तरावर प्रथम क्रमांक रुपेश आळवे (व्हीक्टर डॉन्टस लॉ कॉलेज कुडाळ) रोख रुपये 5000 सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक संग्राम कासले (सुनीता देवी टोपीवाला डीएड कॉलेज मालवण) रोख रुपये 4000 सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक रिया गणेश गिरकर (संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, रोख रुपये 3000 सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तर उत्तेजनार्थ प्रत्येकी 1000 रुपये रोख रक्कम असलेली दोन बक्षीसे - संचिता मंगेश करावडे (दादासाहेब वराडकर कॉलेज कट्टा), व  कु.  नीता दिलीप धुरी (फोंडाघाट महाविद्यालय फोंडा)
 विजेत्या स्पर्धकांना 18 जानेवारी रोजी बॅ. नाथ पे शिक्षण संस्थेच्या स्थापना दिवस व बॅ. नाथ पै यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते व चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी परब यांनी केले तर मंदार जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रस्ताविक प्रा. अरुण मर्गज यांनी केले.
error: Content is protected !!