जनता हीच बॅ. नाथ पै यांच्या आयुष्याची सर्वोत्तम विचारधारा : जयप्रकाश चमणकर

बॅ नाथ पै यांची ५५ वी पुण्यतिथी आणि शिक्षण संस्थेचा २३ वा वर्धापन दिन साजरा
जनता हीच आपल्या आयुष्याची सर्वोत्तम विचारधारा मानून जगलेले, भोळ्या भाबड्या कोकणी लोकांवर मनापासून प्रेम करणारे व त्यांच्या अभ्युदयाचा ध्यास घेणारे बॅरिस्टर नाथ पै हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते, असे उद्गार ज्येष्ठ समाजवादी समाजसेवक जयप्रकाश चमणकर यांनी काढले. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त व बॅरिस्टर नाथ पै यांच्या 55 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत ते होते.
जयप्रकाश चमणकर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, प्रा. अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे, प्रा. कल्पना भंडारी, प्रा. चैताली बांदेकर, पल्लवी कामत, मंदार जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
जयप्रकाश चमणकर यांनी आपल्या मनोगतातून बॅ. नाथ पै यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेतला. ते म्हणाले, लोकशाहीची नीतिमूल्य कृती-ऊक्तीतून लोकांसमोर ठेवणारे, लोकंlप्रतीच्या तळमळीमुळे लोकांच्या आदरास पात्र ठरलेले बॅ. नाथ पै हे अद्वितीय व्यक्तिमत्व होते. त्यांची संसदेतील अभ्यासू भाषणे ऐकण्यासाठी पंतप्रधानांसहित विरोधी पक्षातील खासदार उपस्थित राहात असत. बेळगाव सीमा प्रश्नावर अतिशय तळमळीने त्यांनी कार्य केले व शेवटपर्यंत ते सीमावासियांसाठी लढा देत राहिले. हा लढा देत असतानाच ते आपल्यातून निघून गेले. त्यांचे हे कार्य आजही नवतरुणांना प्रेरणा देणारे आहे. असे सांगत त्यांना अभिवादन केले.
वैचारिक, सामाजिक बांधिलकी मानून शैक्षणिक कार्य करणाऱ्या, शैक्षणिक विकासाचे व्हिजन घेऊन काम करणाऱ्या बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या प्रगतीबद्दल, नवनवीन शिक्षणक्रमांची सोय सिंधुदुर्गवासियांना उपलब्धती करून दिल्याबद्दल व विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देऊन त्यांना साकार करण्यासाठी शिक्षण संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी जे प्रयत्न करत आहेत त्याबद्दल श्री. चमणकर यांनी त्यांना धन्यवाद दिले. तसेच स्पर्धा आयोजनाबद्दल कौतुक केले.
उमेश गाळवणकर यांनी उपस्थित विद्यार्थी, स्पर्धकांना मार्गदर्शन करताना आपल्या मनोगतातून स्वतःची स्पर्धा करा. निश्चित वेळी योग्य ठिकाणी पोहोचू शकाल. जीवन हे खूप छान आहे; ते आनंदाने जगू या. स्पर्धांतून, वर्तमानपत्रातून स्वतः व्यक्त व्हा. समाजात संवाद साधा. असे आवाहन केले. पूर्वीची नेतेमंडळी नितीमूल्य जगणारी होती तर आताची काही मालमत्तेसाठी जगत आहेत. हे अंतर कमी करायचे काम तरुण पिढीने करावे. नितीमूल्याने जगावे. ज्ञान कौशल्य आत्मसात करावीत. आपण समाजाचे काही देणे लागतो याचे भान ठेवून समाजात वावरुया. असे सांगत विजय स्पर्धकांचे व सहभाग घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.
सौ. पल्लवी कामत यांनी आपल्या मनोगतामध्ये समाजवादी विचारसरणीवर श्रद्धा ठेवून समाजाला, आजच्या तरुण पिढीला सामाजिक, वैचारिक भान देतं कार्य करणाऱ्या शिक्षण संस्थेच्या वाटचालीबद्दल गौरवोउद्गार काढत या कार्यक्रमाच्या उत्तम आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करीत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
जयप्रकाश चमणकार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये विजय झालेल्या स्पर्धकांना पारितोषिके वितरित करण्यात आली. विजयी स्पर्धकांतर्फे शालेय गटात प्रथम आलेल्या शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरच्या साक्षी साळकर हिने व महाविद्यालयीन गटात प्रथम आलेल्या रुपेश आळवे यांनी स्पर्धेतील आपले भाषण उपस्थितांसमोर सादर केले व सर्वांची दाद मिळविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अरुण मर्गज यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मानत सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले.





