‘त्या’ अपघात प्रकरणी सा.बां. वर गुन्हे दाखल करा – रुपेश पावसकर

कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेत केली मागणी
सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयावरही धडक
कुडाळ-नाबरवाडी येथे घडलेल्या अपघातासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपअभियंता व शाखा अभियंता यांना जबाबदार धरून त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी केलीय आहे. रुपेश पावसकर यांनी आज सकाळी कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेऊन हि मागणी केली. जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयावरही धडक देऊन त्यांना जाब विचारला.
दि.२ मार्च २०२६ रोजी कुडाळ – नाबरवाडी येथे अपघात घडला व त्यात नेरूर येथील नीलिमा निलेश मेस्त्री यांचा हकनाक बळी गेला. याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग आहे असा आमचा आरोप आहे. रस्त्यावर वाढलेली झाडी रस्त्याची साईडपट्टी यामुळे हा अपघात झालेला आहे. तेथे रस्त्यावर आडवे वाढलेले हे सुरूचे झाड गेले अनेक दिवस लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी तक्रारी करूनही बाजूला केले गेले नाही, याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअभियंता व शाखा अभियंता आहेत. तरी, याबाबत योग्य ती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी तातडीची मागणी नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य रुपेश पावसकर यांनी कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे आज निवेदनातून केली आहे.
त्यानंतर, अनेक दिवस कुडाळ शहर ते नेरूरपार ब्रिज पर्यंत आणि जकात नाका ते कवठी पर्यंत जाणार्या रस्त्यावरही मोठी झाडे रस्त्यावर वाकलेली आहेत, धोकादायक स्थितीत आहेत. दोन्ही प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. यासाठी वारंवार तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम लक्ष देत नसल्याने आज जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयाला धडक दिली. कार्यालयात कोणीही जबाबदार अधिकारी नसल्याचे दिसताच रुपेश पावसकर आक्रमक झाले. त्यांनी कार्यकारी अभियंता श्रीमती इंगवले यांना तात्काळ संपर्क साधून धारेवर धरले. त्यानंतर त्यांनी चर्चेअंती ११ मार्च २०२६ रोजी आपण स्वतः संध्याकाळी ४ वाजता उपस्थित राहून पाहणी करून तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
. यावेळी, पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे, ठाकरे शिवसेना शहर निरीक्षक सुशिल चिंदरकर, नितीन सावंत, प्रविण नेरूरकर, देवीदास नाईक, बाळा पावसकर, शंभुराजे नाईक, गोटू नाईक, अमोल शृंगारे, नारिंग्रेकर आदी उपस्थित होते.





