विधवा प्रथा निर्मूलनासाठी कलमठ ग्रामपंचायत चा निर्णय राज्यातील ग्रामपंचायतींना दीपस्तंभ ठरेल!

राज्य महिला आयोगाकडून कलमठ ग्रामपंचायतचे कौतुक

असा निर्णय राज्यात राबवण्यासाठी महिला आयोग प्रयत्न करणार!

कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायत ने विधवा प्रथा बंद करण्यासाठी जो निर्णय घेतला या निर्णयाची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली आहे. कलमठ ग्रामपंचायत चा हा निर्णय महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींसाठी दीपस्तंभ ठरेल अशा शब्दात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कलमठ ग्रामपंचायत च्या सरपंच व ग्रामसेवक यांचे कौतुक केले आहे. याबाबतचे विशेष अभिनंदन पत्र राज्य महिला आयोगाने कलमठ ग्रामपंचायत च्या सरपंच व ग्रामसेवक यांना पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात विधवा प्रथा पूर्णपणे बंद करण्याचा आणि विधवा महिलांना घरपट्टी व पाणीपट्टी करामध्ये सवलत देण्याचा अत्यंत पुरोगामी आणि धाडसी निर्णय घेतला आहे. आजही समाजातील विधवा महिलांना सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कळमठ ग्रामपंचायतीने केवळ सामाजिक अनिष्ट प्रथांवर घाला घातला नाही, तर त्या भगिनींना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये सवलत देऊन एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे.
आपल्या निर्णयामुळे विधवा महिला स्वतःवर लादलेली बंधने झुगारून सन्मानाने मुख्य प्रवाहात येतील तसेच कर सवलतीमुळे एकल महिलांना कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मोठी मदत लाभणार आहे. हा निर्णय संपूर्ण राज्यातील इतर हजारो ग्रामपंचायतींसाठी दीपस्तंभाचे कार्य करेल व आपल्याप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींनी अनुकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग प्रयत्न करेल. आपण अशा संवेदनशील निर्णयाला दिलेले प्रोत्साहन आणि पाठबळ कौतुकास्पद आहे. महिलांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी काम करणारी सर्वोच्च संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोग आपल्या या निर्णयाचे स्वागत करतो. याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने कलमठ ग्रामपंचायतचे अभिनंदन करण्यात आले आहे.
भविष्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला सबलीकरणाचे असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील, अशी आम्हाला खात्री आहे. आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस व कार्याला आयोगाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा ! अशा शब्दात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कलमठ ग्रामपंचायतचे कौतुक केले आहे.

error: Content is protected !!