बांगलादेशी नागरिकाला बनावट असेसमेंट देणे गोळवण – कुमामे –डिकवल सरपंचांना भोवले

सरपंच सुभाष लाड सदस्य व सरपंच पदावरून अपात्र
कोकण विभागीय आयुक्तांचा दणका
बांगलादेशी नागरिक असलेल्या व्यक्तीला बेकायदेशीर व बनावट असेसमेंट देत त्याला अवैध नागरिकत्व व इतर प्रशासकीय लाभ मिळवून दिल्या प्रकरणी तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांना असेसमेंट देण्याचे अधिकार असताना बेकायदेशीरपणे असेसमेंट देत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मालवण तालुक्यातील गोळवण – कुमामे – डिकवल, ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष दत्ताराम लाड यांना कोकण विभागीय आयुक्त यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) अन्वये सरपंच व सदस्य पदावरून अपात्र केले आहे. त्यामुळे सरपंच सुभाष लाड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
मालवण येथील महेश जुवाटकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार मालवण गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी विभागीय आयुक्तांना आपला अहवाल पाठवत सरपंच सुभाष लाड यांनी गंभीर स्वरूपाचा अपराध केल्याचा ठपका ठेवण्यात आला. यातील मूळ तक्रारीनुसार सनद किताबुल्ला चौधरी गोळवण यांनी ग्रामपंचायतीकडे असेसमेंट मिळण्यासाठी चा अर्ज व मासिक सभेचा ठराव नसताना सरपंच यांनी सनद चौधरी यांना 19 जानेवारी 2023 रोजी असेसमेंट चा उतारा दिला. यामुळे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 व ग्राम विकास विभागाकडील अधिसूचना या मध्ये नमूद केल्याप्रमाणे 1 ते 7 लोकसेवांमध्ये असेसमेंट उतारा देण्याचे अधिकार हे ग्रामपंचायत अधिकारी यांना असताना सरपंच यांनी असेसमेंट उतारा देऊन कर्तव्यात कसूर केली. ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडील 21 /5/ 2025 रोजीचा असेसमेंट चा उतारा व 28 / 5 /2025 चा दाखला पाहता घर क्रमांक 535 रघुनाथ लक्ष्मण चेंदवणकर यांचे नावे असताना देखील सरपंच यांनी मूळ दस्तऐवजात कोणताही फेरफार न करता सनद चौधरी यांना 19 जानेवारी 2023 रोजी हस्तलिखित बनावट असेसमेंट उतारा दिला. तसेच सनद चौधरी या बांगलादेशी नागरिकाला असेसमेंट देऊन त्याला अवैध नागरिकत्व व इतर प्रशासकीय लाभ मिळवून देण्याचा अपराध केला. असा ठपका मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी सरपंच सुभाष लाड यांच्यावर ठेवला. याप्रकरणी कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली. या सुनावणी दरम्यान महेश जुवाटकर व बाबुराव चिरमुले तसेच सरपंच सुभाष लाड यांचे लेखी म्हणणे घेण्यात आले. व त्यानंतर कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी 6 जानेवारी रोजी सरपंच सुभाष लाड यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अहवाल व दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) अन्वये अपात्र ठरवले आहे.





