चित्रकार म्हणून जगण्यात वेगळाच आनंदडॉ प्रमोद वालावलकर स्मृती चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण

चित्रकार श्री मोडक व अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
कलाकाराने आपल्या आवडीच्या कलेतील स्पर्धेत भाग घेतल्यास त्याची कला विकसित होण्यास अधिक चालना मिळते. चित्रकार म्हणून जगण्यात वेगळाच आनंद आहे. डॉ प्रमोद वालावलकर यांच्या सारख्या नि:स्वार्थी, सेवाभावी व नेहमी आनंददायी व्यक्तीच्या स्मृतीना उजाळा म्हणून शालेय विद्यार्थ्यांना आनंद देणारा चित्रकला स्पर्धेसारखा हा उपक्रम अतिशय स्तुत्य व प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार कुडाळ तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात मान्यवरांनी काढले.
आरोग्य क्षेत्रातील सर्वसामान्यांचे देवदूत डॉ प्रमोद वालावलकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांच्या हितचिंतकांच्यावतीने तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिली ते दहावी पर्यंत चार गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला होता. तब्बल 392 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण कुडाळ येथील श्री देवी केळबाई मंदिरात मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.
प्रसिद्ध चित्रकार , शिल्पकार नामानंद मोडक, लाजरी क्रिकेट ग्रुप (कुडाळ)चे अध्यक्ष राजू पाटणकर , उद्योजक जितेंद्र सावंत, डॉ. प्रमोद वालावलकर यांचे बंधू नरेंद्र वालावलकर, शिवसेना (उबाठा) पक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, पाट हायस्कूलचे कलाशिक्षक संदीप साळसकर , श्री देवी केळबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष बंड्या केळबाईकर, उदय कुडाळकर व कृष्णा घाडी, विस्तार अधिकारी (पं. स. कुडाळ) महादेव खरात, ज्येष्ठ मार्गदर्शक व सेवानिवृत केंद्रप्रमुख धोंडू रेडकर, कुडाळ हायस्कूलचे कलाशिक्षक संदीप चिऊलकर, केळूस येथील स. का. पाटील विद्यामंदिराचे कलाशिक्षक बी. जे. थवी, इंजिनिअर पंकज गोसावी आदीच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धातील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली.
श्री मोडक म्हणाले, कलाकारांनी आपल्या आवडीच्या कला प्रकारातील स्पर्धेत भाग घेतल्यास त्याची कला विकसित होण्यास अधिक चालना मिळते. कलेची साधना केली पाहिजे,तरच त्यात यशस्वी होता येते. चित्रकाराला जे आवडते. त्याला जे व्यक्त व्हायचे आहे. ते तो आपल्या चित्रातून व्यक्त करून आनंद घेत असतो. चित्रकार म्हणून जगण्यात जो आनंद आहे तो अन्य कशात नाही. चित्रकाराची एक ताकद आहे, असे त्यांनी सांगून या आयोजकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. तसेच या शालेय विद्यार्थांसाठी आनंददायी ठरला, असे म्हणाले.
श्री साळसकर म्हणाले, जगात वेगवेगळ्या क्षेत्रात झपाट्याने बदल होत गेले. चित्रकला क्षेत्रातही मोठे बदल झाले आहेत. ही कला आपल्याला समाधान निश्चित देऊ शकते. तुम्ही विद्यार्थी या कलेची आवड जोपासत आहात. त्यात प्रगती करून यशाकडे झेप घ्या. तुम्हाला मिळणारी ग्रेड प्रमाणपत्र आर्टस् कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी महत्वाची असतात. या मंडळाचा हा उपक्रम तुमचे भवितव्य घडवेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री थवी म्हणाले, या स्पर्धेतून आयोजकांचे वेगळेपण दिसून आले. कारण जिल्ह्यातील अनेक मंडळे ही अन्य कार्यक्रमाचे आयोजन करणारी असतात. परंतु रांगोळी किंवा चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणारी मंडळे खूप दुर्मिळ आहेत. स्पर्धा परीक्षण पारदर्शी होण्यासाठी चित्रांच्या मागील बाजूस कोड नंबरची पद्धत वापरल्याने परीक्षकांना कोणत्याही विद्यार्थ्यांचे नाव समजले नाही. त्यामुळे परीक्षण हे पूर्णपणे पारदर्शी स्वरूपाचे झाले. या कार्यक्रमावेळी विजेत्याच्या चित्रांचे प्रदर्शन मांडणे हे सुद्धा या आयोजक मंडळाचे एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले चित्र व अन्य चित्रे यांची तुलना करून इतरांनी केलेले रंगकाम पाहण्याची संधी मिळाली, असे गौरवोद्गार त्यांनी काढून विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राला सुंदर अशी फ्रेम बनवून देणारे पहिलेच आयोजक मंडळ आहे. या वेगळेपणामुळे आयोजकांना विद्यार्थ्यांबद्दल असलेले प्रेम व आपुलकी दिसून येते,असे त्यांनी सांगितले.
या निमित्ताने चित्रकार श्री मोडक, कलाशिक्षक श्री साळसकर व श्री देवी केळबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री. केळबाईकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन स्पर्धाप्रमुख नागेश नाईक यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजकामधील धोंडू रेडकर, नागेश नाईक, पंकज गोसावी, केदार टेमकर, विष्णू माणगावकर, पद्माकर वालावलकर, सचिन गडेकर, प्रसाद मेस्त्री, नीलेश पेडणेकर, विद्यानंद (बाबा ) कुमठेकर, गुणाजी बांबुळकर, देवेंद्र समीर ठाकुर, सचिन कुंभार, देवेंद्र परब यांनी परिश्रम घेतले. तसेच या स्पर्धेसाठी उद्योजक कौसर खान, राजू पाटणकर , जितेंद्र सावंत , श्री सकपाळ यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली, तर श्री देवी केळबाई मित्रमंडळाच्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
ग्रामसेवक संतोष पालव, चित्रकार रजनीकांत कदम, मनोज म्हापणकर, अवधूत सावंत, मनोहर गावडे यांच्यासह पालक , चित्रकलापप्रेमी व श्री देवी केळबाई मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.





