आर्थिक फसवणूक प्रकरणी तिघा जणांची निर्दोष मुक्तता

संशयित आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
आर्थिक व व्यावसायीक अडचणीपोटी वेळोवेळी सुमारे १६ लाख ७६ हजार रुपये घेऊन विश्वासघात केल्याप्रकरणी ओरोस खुर्द येथील व्हिक्टर गिरगोल डिसोजा, देवगड येथील गोविंद शंभू पेडणेकर आणि कडावल येथील श्रीकृष्ण विश्वनाथ मुंज यांची सह मुख्य न्यायदंडाधिकारी ए. जी. देशिंगकर यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
ओरोस बुद्रुक येथील रॉनी सायमन डिसोजा याचे आणि व्हिक्टर डिसोजा याचे नात्याचे व मैत्रीपुर्ण संबंध होते. यातून व्हिक्टर याने आर्थिक व व्यावसायीक अडचणीपोटी सप्टेंबर २०१२ पासून डिसेंबर २०१२ पर्यंतच्या कालावधीत वेळोवेळी १६ लाख ७६ हजार रुपये हातउसने घेतले. त्यापैकी काही रक्कम व्हिक्टर याने त्याचे सासरे गोविंद पेडणेकर यांच्या तसेच कडावल येथील व्यापारी श्रीकृष्ण मुंज यांच्या खात्यावर स्विकारली. तर काही रक्कम ओरोस येथील फुलेरिन डिसोजा व मनिष पारकर यांच्या समक्ष स्विकारली. बराच कालावधी होऊनही पैसे न दिल्याने व्हिक्टर याला विचारणा केली असता त्याने जमिन विकून पैसे देतो, असे सांगून नंतर ओरोस येथून कुटुंबासह पोबारा केला. त्यामुळे २०१३ मध्ये फिर्यादी रॉनी याने ओरोस न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्यावरून पोलीस तपास होऊन आरोपींविरूद्ध भादंवि कलम ४०६, ४१८, ४१९, ४२०, १२० ब, ३४ नुसार दोषारोपपत्र दाखल झाले होते. याप्रकरणी एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, सबळ पुरावा न येणे यामुळे आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.





