सिंधुदुर्गात शिवसेनेत पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र

संघटनेत अस्वस्थतता..
तालुका पदाधिकाऱ्यांसह जिल्हा पदाधिकाऱ्यांचेही राजीनामे..
नगरपालिका व नगरपंचायतीत निवडणुकीत राज्यात युतीत असणारी शिवसेना व भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढली. अगदी काही दिवसांवर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत अशाच वेळी मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना तालुका ते जिल्हा पदाधिकारी यांनी संघटनेसाठी वेळ देता येत नाही या वैयक्तिक कारणास्तव राजीनामे दिले आहेत त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेत संघटनेत अस्वस्थता पाहायला मिळतेय.
शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा केला होता या दौऱ्यातून त्यांनी प्रचाराबरोबरच शिवसैनिकात ऊर्जा निर्माण केली होती मात्र स्थानिक आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रकृती अस्वस्थततेमुळे ते पालिका निवडणुकीत प्रचारात सक्रिय नव्हते. त्यामुळे भाजपनेही त्याचे राजकारण केले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांनी पालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर ठाण मांडून कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली होती मात्र शिवसेनेत केवळ मालवण येथे आमदार निलेश राणे यांनी भाजपवर थेट आरोप करत प्रचारात रंगत आणत कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली होती. सध्या वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, महिला तालुकाप्रमुख दिशा शेटकर व उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर यांनी वैयक्तिक कारण दाखवत राजीनामे दिले आहे त्यामुळे संघटनेत अस्वस्थता दिसत आहे. यावर आता आमदार दीपक केसरकर कसा तोडगा काढतात हे पाहावे लागेल.





