प्रतीक वेझरे याची खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५ साठी निवड

प्रतीक बॅ.नाथ पै फिजिओथेरपी कॉलेजचा विद्यार्थी
नाशिक पंचवटी येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या आठ जणांच्या संघात कुडाळ येथील बॅ.नाथ पै फिजीओथेरपीचा विद्यार्थी प्रतिक मंगेश वेझरे याची निवड झाली असून तो राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेच्या संघात सहभागी होणार आहे.
दरवर्षी अखिल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत विद्यापीठाचा संघ पाठविण्यात येतो. हा संघ पाठविण्यापूर्वी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संघाची निवड ही राज्यातील प्रत्येक महसूल विभागातील मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, अमरावती अशा सहा विभागांतून करण्यात येते. त्यामध्ये बॅडमिंटन (Badminton), टेबल टेनिस (Table Tennis), बुध्दिबळ (Chess), जलतरण (Swimming), व लॉन टेनिस (Lawn Tennis) आणि ज्या विद्यार्थ्यांना उपरोक्त खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त आहे किंवा उपरोक्त खेळात आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये नजिकच्या काळामधील प्रमाणपत्र प्राप्त असेल अशाच इच्छूक खेळाडूंना सदर निवड चाचणीसाठी पात्रता मिळते.
११ व १२ नोव्हेंबर रोजी विद्यापीठ क्रीडा महोत्सव व अखिल भारतीय विद्यापीठ संघ (Association of Indian Universities AIU) अंतर्गत श्री सप्तश्रृंगी आयुर्वेद MUHS महाविद्यालय व रुग्णालय पंचवटी, नाशिक येथे झालेल्या बॅडमिंटन क्रीडा प्रकारामध्ये एकूण 128 खेळाडू सहभागी झाले होते त्यामधून बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा प्रतिक मंगेश वेझरे ह्याची बॅडमिंटन संघात टॉप- 8 मध्ये निवड होऊन पुढे होणाऱ्या खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स 2025 साठी त्याची निवड करण्यात आलेली आहे. यासाठी संघव्यवस्थापक म्हणून प्रा. वैजयंती नर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व फिजिओथेरपीचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रत्युष रंजन बिस्वाल यांनी अभिनंदन केले आहे.





