वायंगणी हायस्कूल विद्यार्थ्यांनी घेतला पक्षी निरीक्षणाचा आनंद

शालेय विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक वाढावी, या हेतूने पक्षी सप्ताहाचे औचित्य साधून पक्षी निरीक्षक डॉ. श्रीकृष्ण मगदूम आणि वन्यजीव अभ्यासक स्वप्नील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदीप हायस्कूल वायंगणीच्या विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षणासह पक्षीगणना केली. स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांविषयी सखोल माहिती जाणून घेत असताना विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून वायंगणी गावाला लाभलेली जैवविविधता पुढील पिढीही तितक्याच विश्वासाने जपेल, असा विश्वास डॉ. मगदूम, गोसावी यांनी व्यक्त केला.
पक्षी सप्ताह ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जातो. पक्षी सप्ताह निमित्त यावर्षी वायंगणी (ता. मालवण) येथे पक्षी निरीक्षण व पक्षीगणना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी पक्षीनिरीक्षक डॉ. श्रीकृष्ण मगदूम आणि वन्यजीव अभ्यासक स्वप्नील गोसावी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. पक्षी गणनेत दिवसभरात शंभरहून अधिक पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. यात शिंजिर, फुलटोचा, हळद्या, काळटोप हळद्या, टकाचोर, छोटा सोनपाठी सुतार, शमा, कोतवाल, तांबट, व्याध, कुटूरगा, पिचू पोपट, छोटा खंड्या, बलाकचोच खंड्या यांसारखे स्थानिक पक्षी आढळून आले.
यंदाच्या भरपूर पावसामुळे वायंगणीतील पाणथळ जागा अजूनही पाण्याने समृद्ध आहेत. त्यामुळे लहान व मोठे बगळे, राखी बगळा, छोटा व भारतीय पाणकावळा, तिरंदाज, टिबुकली, कुवा अशा जलपक्ष्यांचीही मोठ्या संख्येने नोंद झाली. तसेच दलदली भोवत्या, लहान खरूची, हिरवा वटवट्या, सामान्य गप्पीदास यांसारखे स्थलांतरित पाहुणेही दिसून आले. संकटग्रस्त प्रजाती असलेला राखी डोक्याचा बुलबुल यावर्षीसुद्धा वायंगणी गावात दिसून आला. सिंधुदुर्गात दुर्मिळ असा लहान खरूची हा पक्षी आढळून आला.
पक्षी निरीक्षण कार्यक्रमात वायंगणी हायस्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुख्याध्यापक दगडू टकले आणि संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी जोराची थंडी असूनही भल्या सकाळी हजेरी लावली. यावेळी शिक्षक हळदणकर व वसावे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी दुर्बीण आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने पक्षीनिरीक्षण केले.
वायंगणी हे तालुक्यातील जैवविविधतेने परिपूर्ण असे गाव. क्षेत्रफळाने लहान असूनही इथे घनदाट जंगल, पाणथळ जागा, विस्तीर्ण सडे आणि समुद्रकिनारा असे विविध अधिवास आढळतात. अधिवासानुसार प्रजातींचा बदल जाणवत असल्यामुळे हे गाव पक्षी निरीक्षणासाठी आदर्श स्थळ आहे, असे डॉ. मगदूम आणि गोसावी यांनी सांगितले.





