एसआरएम कॉलेजमध्ये ‘आरोग्यावर बोलू काही’ कार्यक्रम

कॅन्सर सारखा आजार दूर्धर असल्याचे आतापर्यंत मानले जात होते, मात्र योग्य काळजी घेतल्यास आणि सुरुवातीच्या टप्प्यावर योग्य उपचार केल्यास कॅन्सर मधून पूर्णपणे बरे होता येते. त्यासंदर्भात जनजागृती होणे नितांत आवश्यक आहे असे प्रतिपादन व्ही केअर संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती पाटील शहा यांनी केले. त्या येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये व्ही केअर संस्था, महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष अंतर्गत स्वयंसिद्धा केंद्र आणि आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमांमध्ये बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए .एन.लोखंडे आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे समन्वयक डॉ. दीपक चव्हाण, महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. शरयू आसोलकर, स्वयंसिद्धाच्या समन्वयक प्रा.सुवर्णा निकम, प्रा. गीताश्री ठाकूर उपस्थित होते.
श्रीमती ज्योती पाटील शहा यांनी दृकश्राव्य सादरीकरण माध्यमातून यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच फळे भाज्या यांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे आपल्या आहारावर परिणाम होतो आहे. अशावेळी आपण काळजी घेणे आवश्यक ठरते. शीतपेयांच्या जाहिराती करणारे सेलिब्रिटी स्वतः कधी त्यांचा वापर करतात का याचा तरुण पिढीने विचार केला पाहिजे. कारण जाहिरातींचा प्रभाव तरुण पिढीवर मोठ्या प्रमाणावर पडताना दिसून येतो. व्ही केअर संस्थेतर्फे गेली अनेक वर्षे कॅन्सर संदर्भात सर्वसामान्यांमध्ये असलेली भीती तसेच गैरसमज दूर करण्याचे काम सुरू आहे असे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे . शारीरिक मानसिक तसेच सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य होय असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. शरयू आसोलकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. सुवर्ण निकम यांनी करून दिला. सूत्रसंचालन कु. सानिया धर्णे हिने केले. आभार कु.पूजा प्रभू हिने मानले . या कार्यक्रमाचे संयोजन आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे समन्वयक डॉ. दीपक चव्हाण यांनी केले. यावेळी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रवींद्र ठाकूर, प्रा. स्वप्नजा चांदेकर आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





