विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव देणारे असे उपक्रम राबविणे आवश्यक – कौसर खान

स्व. प्रमोदजी वालावलकर स्मृती प्रित्यर्थ चित्रकला स्पर्धा
आरोग्य क्षेत्रातील डॉ. प्रमोद वालावलकर यांचे समाजातील सेवा कार्य विसरता येणार नाही. नि:स्वार्थ बुद्धीने त्यांनी गोरगरीब रुग्णांची सेवा केली. अशाच लोकांमुळे समाज टिकून आहे. आजचे विद्यार्थी मोबाईल जास्त हाताळतात. त्यामुळे विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव देणारे असे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. या चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थांचा उत्साह पाहून समाधान वाटले. विद्यार्थ्यासाठी असे उपक्रम राबविले पाहिजे. त्यासाठी आपले सहकार्य राहील, असे प्रतिपादन कुडाळ – एमआयडीसी येथील उद्योजक कौसर खान यांनी केले. कुडाळ येथे तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगु ते बोलत होते. या स्पर्धेला विद्यार्थ्याचा उदंड प्रतिसाद मिळाला. एकूण ३९२ विद्यार्थांनी सहभाग घेतला.
आरोग्य क्षेत्रातील जनसामान्याचे देवदूत डॉ. प्रमोद वालावलकर यांच्या हितचिंतक मित्रमंडळींच्यावतीने व श्री देवी केळबाई उत्सव मंडळाच्या सहकार्याने कुडाळ येथील श्री देवी केळबाई मंदिरात स्व. प्रमोदजी वालावलकर स्मृती प्रित्यर्थ कुडाळ तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी चार गटात सदर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेदरम्यान आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व स्पर्धक विद्यार्थांना सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. श्री देवी केळबाई उत्सव मंडळाचे अध्यक्ष नारायण (बंड्या) केळबाईकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. तसेच उद्योजक कौसर खान यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार, तर लाजरी क्रिकेट ग्रुप (कुडाळ) अध्यक्ष राजू पाटणकर यांच्या हस्ते श्री देवी सरस्वती मातेच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. नगरसेवक गणेश भोगटे, माजी नगराध्यक्षा अक्षता खटावकर, श्री केळबाई उत्सव मंडळाचे उदय कुडाळकर, कृष्णा पाटकर,कृष्णा घाडी, सुहास राऊळ, नंदू राऊळ, दादा पाचेकर, स्पर्धेचे मार्गदर्शक व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख धोंडू रेडकर, कुंभारवाडा शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका स्वप्नाली सावंत, सहाय्यक शिक्षिका सायली कदम, शिक्षक गुरुप्रसाद सावंत, शिक्षिका चैत्राली पाटील व अश्विनी सावंत, श्री केळबाई उत्सव मंडळाचे रुपेश राऊळ, प्रसाद वाडयेकर, आबा घाडी, अनंत खटावकर, संतोष केळबाईकर, सना राऊळ व शैलेश घाडी यांची प्रमुख उपस्थित होते
कौसर खान यांनी आपण समाजाचे देणे लागतो. या भावनेतून काम केले पाहिजे. या स्पर्धेच्या माध्यमातून ही लहान मुले एकत्र आली. त्यांना आनंद मिळाला. अशा उपक्रमातून मुलाच्या कलागुणांना वाव मिळून ती भविष्यात या कलेत करिअर करू शकतात, असे सांगितले. स्वप्नाली सावंत यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा हा आजचा उपक्रम आहे. अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या आवडीच्या अंगीभूत कला अधिक वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमाची गरज आहे. आपल्या मुलांच्या कलेची आवड जोपासण्यासाठी पालक त्यांना प्रोत्साहन देतात, असे सांगितले. अक्षता खटावकर यांनी विद्यार्थ्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. बंड्या केळबाईकर व राजू पाटणकर यांनीही शुभेच्छा दिल्या.
चित्रकार व रांगोळीकार केदार टेमकर (सरंबळ), चित्रकार विष्णू माणगावकर (झाराप) व प्रसाद नाईक (बिबवणे) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत कॉम्प्युटर इंजिनिअर पंकज गोसावी यांनी, तर सूत्रसंचालन स्पर्धा प्रमुख नागेश नाईक यांनी केले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी स्पर्धा मार्गदर्शक धोंडू रेडकर, नागेश नाईक, केदार टेमकर, पंकज गोसावी, पद्माकर वालावलकर, प्रसाद मेस्त्री, नीलेश पेडणेकर, सचिन गडेकर, कृष्णा मेस्त्री, विद्यानंद (बाबा) कुमठेकर, देवेंद्र परब, भरत मेस्त्री, ओंकार मडवळ, प्रसाद टेमकर, प्रसाद नाईक, संदीप गडेकर यांच्यासह श्री देवी केळबाई मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी – कार्यकर्ते, कुंभारवाडा शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी मेहनत घेतली. या स्पर्धेसाठी राजू पाटणकर, कौसर खान, जालमसिंह पुरोहित यांचे सहकार्य लाभले.
डॉ. प्रमोद वालावलकर यांच्या पत्नी प्रज्ञा वालावलकर, शिवसेना उबाठाचे कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक , लाजरी क्रिकेट ग्रुपचे राजेश म्हाडेश्वर, विस्तार अधिकारी (प. स. कुडाळ ) महादेव खरात व चित्रकार रजनीकांत कदम यांनी स्पर्धेला भेट देत शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या निमित्ताने युवा चित्रकार केदार सखाराम टेमकर यांनी फलक लेखनातून साकारलेली डॉ. प्रमोद वालावलकर आणि आई केळबाई देवीची सुबक व देखणी कलाकृती लक्ष्यवेधी ठरली.
या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. अपेक्षेपेक्षा जास्तच विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. एकूण 392 विद्यार्थी सहभागी झाले होते. चित्र कुंचल्यात कधी साकारतो याची उत्कंठा व उत्साह विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. आई केळबाई देवीच्या छायेखाली मंदिरात दोन ठिकाणी आणि तेथीलच कुंभारवाडा शाळेत स्पर्धेची बैठक व्यवस्था करण्यात आली. पालकांनीही चांगले सहकार्य केले. आयोजनाबाबत पालकांनी कौतुकोद्गार काढले.





