कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांना पदोन्नती

आता रत्नागिरीचे जिल्हा सहनिबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी
कुडाळ तहसीलदार म्हणून उल्लेखनीय कार्य केलेल्या वीरसिंग वसावे यांची अलीकडेच जिल्हा सहनिबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, रत्नागिरी या पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
वीरसिंग वसावे यांनी दि.५ फेब्रुवारी २०२४ रोजी कुडाळ येथे तहसीलदार म्हणून कार्यभार स्वीकारला होता. कार्यकाळात त्यांनी महसूल विभागाशी संबंधित विविध जनतेच्या कामांना गती देत अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले. शाळा तिथे दाखले शिबिर या उपक्रमात संपूर्ण जिल्ह्यात कुडाळ तहसीलने नंबर एक कामगिरी केली. तसेच ‘जीवंत सातबारा’ मोहीम, ‘एग्रीस्टॅक’ मोहीम, टेनेन्सी प्रकरणे, एएलटी प्रकरणे, जन्म-मृत्यू नोंदणी, ८५अ प्रकरणे, सेवा पंधरवडा उपक्रमातील संजय गांधी निराधार प्रकरणे, वारस तपास आदी महसूल संबंधित कामे तातडीने व पारदर्शकपणे निकाली काढण्यावर त्यांनी भर दिला. पावसाळी मौसमात आपत्कालीन परिस्थितीत त्या त्या ठिकाणी वेळी अवेळी प्रत्यक्ष भेट देऊन लोकांना धीर दिला.
कुडाळमध्ये कार्यरत असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या लोकाभिमुख कामकाजामुळे तालुक्यातील जनतेत त्यांचा चांगला विश्वास व आदर निर्माण झाला.त्यांच्या या प्रामाणिक व जनहितकारी कार्याची दखल घेत शासनाने त्यांची जिल्हा सहनिबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, रत्नागिरी या पदावर पदोन्नती केली आहे. या पदोन्नतीनंतर विविध सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक, तसेच सहकारी अधिकारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





