कुडाळ न. पं. च्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी केली मलकापूर आणि विटा न. प. च्या घनकचरा प्रकल्पांची पाहणी

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी मलकापूर व विटा नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पांची पाहणी केली. या प्रकल्पांमध्ये वापरण्यात आलेल्या यंत्रसामग्रीची साधने आणि मनुष्यबळ याबाबत माहिती घेतली.
कुडाळ नगरपंचायतीने एमआयडीसी येथे कचरा व्यवसथापन उद्योग प्रकल्पासाठी जागा घेतली आहे. हा उद्योग प्रकल्प कोणालाही त्रासदायक होऊ नये या प्रकल्पातून प्रदूषित हवा दुर्गंधी निर्माण होऊ नये याची काळजी कशाप्रकारे घेतली जाऊ शकते, त्यासाठी वापरण्यात येणारे यांत्रिक सामग्री, मनुष्यबळ, अत्याधुनिक तंत्र याचा वापर कसा करता येईल, त्यासाठी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, प्रशासनातील अधिकारी राजू पठाण, श्री. नाटेकर यांनी मंगळवार ता ४ नोव्हेंबर रोजी कराड मधील मलकापूर व विटा नगरपरिषदेला भेट दिली आणि त्यांच्या प्रकल्पांची पाहणी केली. या प्रकल्पामध्ये वापरण्यात आलेल्या यंत्रसामग्रीची माहिती घेतली. तसेच प्रकल्पापासून कोणतीही दुर्गंधी होणार नाही. यासाठी वापरण्यात आलेली यंत्रणा याची माहिती घेतली. या प्रकल्पांची माहिती नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दिली.
दरम्यान अजून काही अत्याधुनिक कचरा उद्योग प्रकल्पावरील प्रकल्प पाहण्यात येणार आहेत. या प्रकल्पातील चांगल्यात चांगला प्रकल्प आणण्यात येईल. ज्या प्रकल्पाचा नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत, असे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले.





