जुन्या कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चांमध्ये रमले आमदार निलेश राणे!

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंसोबत काम केलेले नेते आले एकत्र

आमदार निलेश राणेंकडून जुन्यांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत त्या वेळेच्या शिवसेनेमध्ये काम केलेले अनेक कार्यकर्ते हे मोठ्या पदांवर पोचले. यातील काही कार्यकर्ते हे सध्या आमदार निलेश राणे यांच्या संपर्कात असून, त्यांच्या सोबत त्यांनी कुडाळ मालवण मतदार संघात काम देखील चालू केले. त्यातच नरेंद्र मोदी एकेकाची कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले माजी आमदार राजन तेली यांनी नुकताच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. राजन तेली व निलेश राणे यांची मैत्री ही सर्वश्रुत असताना कुडाळ येथे अनौपचारिक गप्पांच्या चर्चा रंगल्या. यावेळी निलेश राणे यांच्यासोबत माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, अस्मिता बांदेकर यादेखील उपस्थित होत्या. या सर्वच पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सोबत काम केलेले असून, राणेंच्या शब्दाला आदेश म्हणून जीवाला जीव देणारे कार्यकर्ते म्हणून यांची ओळख होती. मात्र दरम्यानच्या काळात राजकीय गणिते बदलली व यातील काहीनी वेगळी राजकीय वाट धरली. परंतु आता पुन्हा एकदा ठाकरे शिवसेनेतून राजन तेली हे शिंदेंच्या शिवसेनेत परतले. त्यापूर्वी संजय पडते हे देखील शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले होतेच. महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या पवारांच्या राष्ट्रवादी चे सिंधुदुर्गाचे नेते काका कुडाळकर यांनी देखील एकेकाळी राणें सोबत काम केले असून, सध्या ते महा युतीच्या घटक पक्ष राष्ट्रवादीमध्ये कार्यरत आहेत. अस्मिता बांदेकर या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून परिचित होत्या. या सर्वच जुन्या जाणत्या नेत्यांनी निलेश राणेंबरोबर कुडाळ येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत च्या आठवणीतील गप्पा मारल्या. आणि त्या जुन्या आठवणींना या निमित्ताने उजाळा देखील मिळाला. विशेष म्हणजे एकदा निलेश राणे हे देखील जुन्या कार्यकर्त्यांच्या गप्पांमध्ये रंगले. निलेश राणे यांची काम करण्याची कार्यपद्धती ची एक वेगळी स्टाईल असल्याने निलेश राणेंसोबत जुन्या कार्यकर्ते, नेत्यांची फळी आता अनुभवाची शिदोरी घेऊन पुन्हा एकदा त्यांच्यासोबत शिवसेनेत सक्रिय होऊ लागली आहे. येत्या काळात अजूनही काही जुने जाणते कार्यकर्ते निलेश राणेंसोबत येऊ घातलेले असल्याने येत्या काळात कुडाळ मालवण सहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेला अनुभवाचे बळ मिळणार आहे. त्यातच आज झालेली भेट व जुन्यांसोबत निलेश राणेंचा फोटो सोशल मीडिया मध्ये व्हायरल होत असून या फोटोमुळे जुन्यांच्या अनुभवाची मोट निलेश राणे बांधत असल्याचेही या निमित्ताने दिसून आले आहे.

error: Content is protected !!