कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीसाठी माजी आमदार राजन तेलींकडून पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

कणकवलीत तेलींच्या निवासस्थानी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती
नगरपरिषद, नगरपंचायतीची प्रभाग रचनेनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, कालच कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांनी कणकवली मध्ये माजी आमदार राजन तेली यांच्या स्वागताला उपस्थिती लावली. त्यानंतर लागलीच आज कणकवली शहरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची एक महत्त्वाची बैठक माजी आमदार राजन तेली यांच्या निवासस्थानी घेण्यात आल्याचे समजते. या बैठकीमध्ये कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सक्रिय होण्याचे आदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघाची जबाबदारी माजी आमदार राजन तेली यांच्याकडे पक्षाच्या वरिष्ठांनी सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, त्यामुळे कणकवली शहर हे होम पीच असलेल्या राजन तेली यांच्याकडून आज निवासस्थानी बैठक घेत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देण्यात आला. यावेळी महायुती म्हणून कणकवली नगरपंचायत निवडणुकीला सामोरे जायचे असल्याच्या सूचना देण्यात आल्या. महायुतीत जागा वाटपाचा निर्णय हा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर होणार असून, प्रत्येक वार्डात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपले उमेदवार उभे करण्याच्या अनुषंगाने तयारीला लागा असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येणार? नगराध्यक्ष पद भाजपकडे गेले तर उपनगराध्यक्ष शिवसेना दावा करणार का? की शिवसेना नगराध्यक्षपदावर दवा करणार? यासह अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडी येत्या काळात होणार असून यामध्ये कणकवली मतदार संघामध्ये देखील रंगतदार राजकारण पाहायला मिळू शकते .राजन तेली यांचा कणकवली शहराशी अनेकदा जवळून संबंध राहिला असून, कणकवली मतदार संघाची शिवसेना पक्षाची जबाबदारी तेलींवर सोपवली गेल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच नगरपंचायत निवडणूक तोंडावर असल्याने आता आजच्या बैठकीच्या घडामोडीवर सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदारसंघात दोन महत्त्वाचे मेळावे देखील होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे महायुती मध्ये काय खलबते घडणार? महायुती मधील मित्रपक्ष म्हणून शिवसेना काय भूमिका घेणार? व त्या अनुषंगाने अनेक घडणाऱ्या घडामोडींवर कणकवलीसह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली





