माजी आमदार राजन तेली यांचा शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश होणार

शिवसेना ठाकरे गटासहित सिंधुदुर्ग भाजपला देखील धक्का
पालकमंत्री नितेश राणेंवर यांच्यावर कालच केले होते जोरदार आरोप
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी आमदार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजन तेली यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री व शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेच्या मुंबई येथील मेळाव्यात हा प्रवेश होणार असून, सिंधुदुर्गातील कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचा या प्रवेशांमध्ये मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. हा प्रवेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाला धक्का मानला जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपला देखील एक प्रकारे हा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. कालच राजन तेली यांची भाजपाचे मंत्री व सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात पत्रकार परिषद झाली होती. जिल्हा बँकेच्या बाबत बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व बँकेचे संचालक पालकमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात अनेक आरोप राजन तेली यांनी केले होते. त्यातच राजन तेली यांची ही पत्रकार परिषद शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयात न होता त्यांनी स्वतःच्या घरी घेतली होती. गेले काही दिवस राजन तेली भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. परंतु त्यांच्या भाजपा प्रवेशाला जिल्ह्यातील प्रमुख नेतृत्वाचा विरोध असल्याची बोलले जात होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर राजन तेली यांनी सर्वांनाच धक्का देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय झाल्याने कुडाळ मालवण मतदारसंघात विद्यमान आमदार निलेश राणे यांची ताकद अजून वाढण्यासाठी या प्रवेशाची मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. या प्रवेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणामध्ये काही बदल होतील की नाही हा येणारा काळ ठरवेल. परंतु कुडाळ मालवण मतदार संघात मात्र निलेश राणे यांना अनुभवाची ताकद मिळणार आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश शिंदे शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. राजन तेली व आमदार निलेश राणे यांचे मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे या मैत्रीपूर्ण संबंधाचे पडसाद येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसणार आहेत.
दिगंबर वालावलकर कणकवली





