कणकवली शहरातील उड्डाणपुलाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

उड्डाण पुलाच्या रस्त्याला मोठे तडे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर

महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीकडून सातत्याने मलमपट्टी चे काम

पुलाच्या दर्जा बाबत शंका असल्याने अजूनही पुलाच्या दोन्ही बाजूच्या एका लेन चा भाग तीन वर्षहुन अधिक काळ बंद

शहरातील उड्डाणपुलावरील रस्त्याला तडा गेला होता. तो रूंदावत चालल्याने अपघातांची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर महामार्ग विभागाने तडा गेलेल्या ठिकाणचे क्राँक्रिटीकरण काढून तेथे नव्याने काम सुरू केले आहे. यापूर्वी अशा प्रकारे तडे गेल्यानंतर महामार्ग प्राधिकरण कडून शासकीय उत्तर देऊन सारवासारव करण्यात आली होती. मात्र, उड्डाणपूल उभारणीनंतर वारंवार असे प्रकार होत असल्याने पुलाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. त्यातच यामुळे भविष्यात धोकाही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उड्डाणपूल उभारताना, तापमानातील चढउतार यामधील तांत्रिक कारणाकरिता पुलाच्या दोन गर्डरमध्ये काही अंतर मोकळे सोडले आहे. तर काही ठिकाणी दोन गर्डर जोडणाऱ्या सांध्यामध्ये सिमेंट क्रॉंकीट करून बंद करण्यात आले. यातील तहसीलदार कार्यालय समोरील दोन गर्डर मधील सिमेंट उखडले. त्यातील भेग रुंद होत चालल्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली होती. गेल्या चार दिवसांत ही भेग आणखी रूंदावत चालल्याने अपघातांची शक्यता होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर महामार्ग विभागाने त्या ठिकाणच्या दुरूस्तीचे निर्देश दिलीप बिल्डकॉन या कंपनीला दिले होते.
रविवार दुपारपासून येथील रुंदावलेली भेग दुरूस्त करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यात गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरील दोन्ही गर्डरच्यावरील काँक्रिट फोडून तेथे नव्याने क्राँक्रिटीकरण केले जाणार आहे. या लेनवरील काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते गोवा लेनवरील दुरूस्तीचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती दिलीप बिल्डकॉनकडून देण्यात आली.
शहरातील १२०० मीटरच्या उड्डाणपुलाचे काम फेब्रुवारी २०२१ मध्ये पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरू झाली. मात्र, पहिल्याच पावसांत पुलावरील गांगोमंदिर ते एस.एम. हायस्कूल भागात तडे गेले होते. तर जुलै २०२२ आणि ऑगस्ट २०२३ मध्ये याच भागातील उड्डाणपुलाच्या भिंतीचा काही भाग कोसळला होता. आताचे पालकमंत्री व त्यावेळी आमदार असलेले नितेश राणे यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले होते. या ठिकाणची दुरूस्ती झाली असली तरी गांगोमंदिर ते एस.एम. हायस्कूल या दोनशे मीटर भागात उड्डाणपुलावरील दोन लेन बंद ठेवल्या असून दोन्ही बाजूच्या प्रत्येकी एका लेनवरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे यापूर्वी सर्व करणारे महामार्ग प्राधिकरण आता उड्डाणपुलाच्या रस्त्याला तडे गेल्या प्रकरणी काय भूमिका घेणार असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!