कवी अजय कांडर यांच्या ‘ बाया पाण्याशीच बोलतात’ कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा

२८ रोजी इचलकरंजी येथे संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजन
डॉ. रणधीर शिंदे, डॉ. रफिक सुरज, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. संजीवनी पाटील आदी अभ्यासकांचा सहभाग
मराठीतील नामवंत कवी अजय कांडर यांच्या मराठी साहित्यात बहुचर्चित ठरलेल्या "बाया पाण्याशीच बोलतात" या कवितेचा रौप्यमहोत्सवी चर्चासत्र सोहळा रविवार २८ सप्टेंबर रोजी सायं.४ वा.इचलकरंजी येथील नाईट कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठान आणि नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र होत असून सुप्रसिद्ध समीक्षक तथा शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.रणधीर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या चर्चासत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून
कवी, कादंबरीकार,समीक्षक प्रा.डॉ. रफिक सुरज, कवी, समीक्षक प्रा. एकनाथ पाटील आणि समीक्षक प्रा संजीवनी पाटील यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे आणि नाईट कॉलेजचे प्राचार्य विरूपाक्ष खानाज यांनी दिली.
अजय कांडर यांचा ‘ आवानोल ‘ हा लक्षवेधी काव्यसंग्रह २००५ मध्ये प्रसिद्ध झाला. यातील पहिलीच ‘ बाया पाण्याशीच बोलतात’ ही कविता २००१ मध्ये मौज दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाली आणि या कवितेला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मौज मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर या कवितेसाठी ज्या अनेक मान्यवरांनी प्रतिसाद दिला त्यात कवी ग्रेस यांनी या कवितेसाठी अजय कांडर यांचे फोन करून अमाप कौतुक केले होते. तर ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. सोमनाथ कोमारपंत यांनी या कवितेवर स्वतंत्र समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध केला होता. ज्येष्ठ अनुवादक कवी समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी ‘ प्रगतशील वसुधा ‘ या हिंदी नियतकालिकाच्या १९६०नंतरचे मराठी साहित्य या अनुवाद विशेषांक मध्ये सदर कवितेचा समावेश केला होता. तर या कवितेचा हिंदी अनुवाद साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अनुवादक प्रफुल्ल शिलेदार यांनी केला होता. ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांनी आयुष्यात प्रत्येक कवीला एकदा तरी या उंचीची कविता लिहिता यायला हवी असे जाहीर उद्गार काढले होते. त्याचबरोबर ‘ बाया पाण्याशीच बोलतात’ या कवितेचा चार विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आणि नववीच्या शालेय अभ्यासक्रमात असा एकूण पाच अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यात आला. समीक्षक प्रा संजीवनी पाटील यांनी या कवितेवर दीर्घ लेख लिहिला असून ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस संपादित मुराळी नियतकालिकांमध्ये सदर लेख प्रसिद्ध झाल्यावर अनेक मान्यवरांनी या समीक्षा लेखनाचे कौतुकही केले होते. गेली २५ वर्ष कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सदर कविता चर्चिली जात असून बाई आणि पाणी याचं नातं सनातन आहे.त्याचा प्रभावीपणे उद्गार या कवितेतून करण्यात आल्याचे मत अनेक मान्यवर समीक्षकांनी व्यक्त केले आहे. या कवितेच्या प्रभावातून मराठीत अनेक नव्या कवीनी कविता लिहिल्या असून मराठी साहित्यात ‘ बाया पाण्याशीच बोलतात’ ही कविता अभिजात कविता म्हणून ओळखली जाते. या चर्चासत्रा विषयी बोलताना चर्चासत्राचे मुख्य आयोजक कवी महावीर कांबळे म्हणाले, २००१मध्ये मौज दिवाळी अंकात सदर कविता प्रसिद्ध झाली या घटनेला यावर्षी २५ वर्ष होत आहेत. ही कविता नववीच्या अभ्यासक्रमाला असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना शिकवली असून या कवितेचे आमच्या मनातील ममत्व जाहीरपणे व्यक्त व्हावे या भावनेने आमच्या संस्कृती प्रतिष्ठान आणि नाईट कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने बाया पाण्याशीच बोलतात या कवितेवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. तरी साहित्य रसिकांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे असे आवाहन महावीर कांबळे आणि प्राचार्य विरूपाक्ष खानाज यांनी केले असून अधिक माहितीसाठी संपर्क- अनुराधा काळे – ९०७५५ ४८३५३





