प.स. कुडाळमध्ये १९ ऑगस्टला रानभाजी पाककृती स्पर्धा

बीडीओ प्रफुल्ल वालावलकर यांची माहिती
पंचायत समिती कुडाळ यांच्या वतीने दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता रानभाजी पाक कला स्पर्धा व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिली.
कुडाळ पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कृषी विस्तार अधिकारी संदेश परब, महादेव खरात, सोनिया पालव तसेच लघु पाटबंधारे विभागाचे मंगेश हवालदार उपस्थित होते.
यावेळी प्रफुल्ल वालावलकर यांनी या महोत्सवाची माहिती दिली. हा महोत्सव पंचायत समितीच्या अल्पबचत सभागृहात होणार आहे. आपल्या कोकणात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवतात. त्या खण्यासाठी पौष्टिक असतात. पण त्याची माहिती शहरी भागात राहणाऱ्या लोकांना नसते. तसेच आजच्या आपल्या आहारात जास्त करून रासायनिक खतांवर वाढलेल्या भाज्या असतात. त्यामुळे रोगांना निमंत्रण मिळते. या उलट या रानभाज्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. त्याची माहिती व्हावी तसेच त्यापासून तयार होणाऱ्या पाककलांची माहिती व्हावी या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे स्वरूप स्पर्धात्मक असून उत्कृष्ट पाककलाकृतींचे मान्यवर परीक्षक परीक्षण करून तीन क्रमांक काढणार आहेत. त्याना आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत.
या रानभाजी पाककला महोत्सवात महाराष्ट्र राज्य जीवन्ननोती अभियानाच्या बचतगटाच्या महिला सहभागी होतील. एकूण नऊ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागातून तीन महिला सहभागी होणार आहेत. तसेच आंगणवाडीचे ८ बिट आहेत. प्रत्येक बिट मधून २ सेविका किंवा मदतनीस सहभागी होतील. पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केले आहे.
स्पधेचे नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत ही स्पर्धा वैयक्तीक स्वरूपाची घेतली जाणार आहे. हि स्पर्धा कुडाळ तालुक्यासाठी मर्यादित असेल. कुडाळ तालुक्यातील बचत गटातील सदस्य, तसेच पंचायत समिती अंतर्गत अधिकारी व कर्मचारी स्पर्धेमध्ये भाग घेउ शकतील. स्पर्धकाने एकापेक्षा अधिक पदार्थ बनविले असल्यास स्पर्धकाने दिलेल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे गुणांकन केले जाईल. पाककला स्पर्धेमध्ये कोकणात होणाऱ्या रानभाज्यांचा समावेश करता येईल. ज्या भाजीचा पदार्थ बनविणार आहे त्या भाजीचा मुळ नमुना, पाककृती (लिखित स्वरुपात) सोबत आणणे व पाककृतीसोबत ठेवणे आवश्यक आहे. पदार्थ मांडणीसाठी लागणारे सर्व साहित्य स्पर्धकाने स्वतः आणावयाचे आहे. (प्लेट, सजावट साहित्य इ.) सर्व पदार्थ हे रानभाजीचे असावेत. व त्याच्या कृतीचे मांडणी स्पर्धकाने करणे आवश्यक आहे. चव, पौष्टीक मुल्य, मांडणी/प्लेटींग, स्वच्छता याचा विचार करून गुणांकन करण्यात येईल. पदार्थ मांडणीची सुरुवात सकाळी ठीक 9.00 वाजता होणार असून दिलेल्या वेळेतच उपस्थित रहावे. उशिरा येणाऱ्या स्पर्धकांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही. रानभाज्या पाककलास्पर्धेच्या गुणांकनानुसार प्रथम येणाऱ्या 3 स्पर्धकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. इच्छूक स्पर्धकानी आपली नावे आपल्या विभागामार्फत कृषि विभाग, पंचायत समिती कुडाळ यांचेकडे दिनांक 18/08/2025 दुपारी 12.00 वाजेपर्यंत द्यायची आहेत.
अधिक अमहितीसाठी आणि नोंदणी साठी श्रीम. सोनिया पालव, विस्तार अधिकारी (कृषि) (9404439575) किंवा संदेश परब, विस्तार अधिकारी (कृषि) (9423881666) यांच्याशी संपर्क साधायचा आहे.





