ठाकरे शिवसेनेच्या मुंबई गोवा महामार्गाच्या उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासन खडबडून जागे

उद्या मुंबईमध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत तातडीची बैठक
उद्याची बैठक निव्वळ दिखाऊपणा पुरती
माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल ठाकरे शिवसेने कडून उद्या कुडाळ हुमरमळा येथे आंदोलन जाहीर केल्यानंतर या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून उद्या 13 ऑगस्ट रोजी तातडीची बैठक सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे दुपारी 12.15 वाजता लावली आहे. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांसहित कोकण विभागीय आयुक्त, मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीचे पदाधिकारी व राज्य शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. या समितीच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच ठाकरे शिवसेनेकडूनही यासंदर्भात उद्याच आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून या आंदोलनाच्या माध्यमातून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करा अशी मागणी देखील ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आली आहे. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असताना या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तातडीने बैठक लावल्याने अखेर शासन खडबडून जागे झाल्याचे दिसून येत आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाची पुरती दुरावस्था झाली असून, सिंधुदुर्ग च्या पुढे रत्नागिरी, रायगड मध्ये तर महामार्गाचे अनेक ठिकाणी कामही सुरू नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव देखील चाकरमान्यांना खड्ड्यातूनच कोकणात यावे लागणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर उद्या आयोजित केलेली बैठक ही निव्वळ दिखाऊपणाची असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली





