सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील वृद्ध कलाकारांना समितीच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू!

वृद्ध कलाकार मानधन समितीच्या बैठकीत वृद्ध कलाकारांच्या 100 प्रस्तावांना मंजुरी
वृद्ध कलाकारांच्या हितासाठी समिती तातडीने गठीत केल्याबद्दल पालकमंत्री, खासदार व दोन्ही आमदारांच्या अभिनंदनचा ठराव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वृद्ध कलाकारांना मानधन समितीच्या माध्यमातून न्याय देत असताना जिल्ह्यातील एकाच क्षेत्रातील नाहीतर विविध क्षेत्रातील वृद्ध कलाकारांना मानधन मिळण्याच्या दृष्टीने समितीच्या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजेत. अशा सूचना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तथा राजश्री शाहू महाराज वृद्ध कलाकार समितीचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी दिल्या. या बैठकीमध्ये वृद्ध कलाकारांच्या शंभर प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे वृद्ध कलाकारांना दरमहा 5000 रुपये अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे राजश्री शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन समितीची पहिली बैठक आज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीदरम्यान ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्हा हा विविध क्षेत्रातील कलांनी नटलेला व कलाकारांनी संपन्न असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यातील भजनी क्षेत्रासोबतच फुगडी, दशावतार, यासह अन्य अनेक कलाकार गेली अनेक वर्षे आपल्या कला सादर करत या कला जोपासत आहेत. या सर्व कलाकारांचा मान सन्मान या समितीच्या माध्यमातून त्यांचे परिपूर्ण प्रस्ताव घेत ते मंजूर करून करण्याबाबत श्री पाटील यांनी सूचना दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार माजी मंत्री दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांनी ही समिती गठित करण्याबाबत तातडीने निर्णय घेतला याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव भजनी कलाकार संघटनेचे अध्यक्ष व या समितीचे सदस्य बुवा संतोष कानडे यांनी मांडला. त्याला सर्वांनी अनुमोदन दिले. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांच्या हिता संदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीला रितेश सुतार, विष्णू सुतार, अजिंक्य पाताडे, संदीप नाईक धुरे, मयूर ठाकूर, विजय सावंत, भालचंद्र केळुस्कर, महेंद्र गवळी, राघोजी सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा. प, यांच्यासहित अन्य उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





