नवंउद्योजकांसाठी एसआरएम कॉलेजमध्ये फ्युचरप्रेन्युअर्स कार्यशाळा

आकार फाउंडेशन, एमआयडीसी असोसिएशन, जिल्हा व्यापारी संघ, रोटरी यांचा सहभाग
युवा उद्योजकांना मिळणार उद्योग संकल्पनेसाठी पूर्ण सहकार्य
कुडाळ : भविष्यातील उद्योजक तयार करण्यासाठी अगदी महाविद्यालययीन जीवनापासून उद्योगाविषयीची माहिती देण्यासाठी आकार फाऊंडेशन आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय फ्युचरप्रेन्युअर्स हि एक अभिनव संकल्पना घेऊन पुढे आले आहेत. स्पर्धात्मक उपक्रम असलेल्या या फ्युचरप्रेन्युअर्स कार्यशाळेत महाविद्यालयातील १७ टीम आपापले प्रोजेक्ट घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी पाच टीमची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. त्यांना उद्योग उभारणीसाठी लागणारे पूर्ण सहकार्य संत राऊळ महाराज महाविद्यालय, आकार फाउंडेशन यांच्या सोबतच एमआयडीसी असोसिएशन, जिल्हा व्यापारी महासंघ, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि कमशिप्र मंडळ हा संस्था देणार आहेत. अशी माहिती आकार फाउंडेशनचे गजानन कांदळगावकर यांच्यासह नितीन तायशेटये, नकुल पार्सेकर, डॉ. स्मिता सुरवसे, सचिन मदने, डॉ. नितीन पावसकर यांनी दिली. संत राऊळ महाराज महाविद्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वर्तमान काळातील स्पर्धात्मक आणि सतत बदलणाऱ्या उद्योगक्षेत्रात नवनवीन कल्पना, नैसर्गिक साधनसंपत्ती व शाश्वत विकास आणि नैतिक व्यावसायिक मूल्ये आत्मसात करून तरुण पिढीला उद्योजकतेकडे प्रवृत्त करण्यासाठी आकार फाऊंडेशन आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने Futurepreneurs Step Towards Future Entrepreneurship हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम नवोन्मेष (Innovation), शाश्वतता (Sustainability), नैतिकता (integrity), सर्वसमावेशकता (Inclusiveness) आणि मार्गदर्शन (Mentorship) या पाच मूलभूत स्तंभांवर आधारित आहे. या प्रयोगाचा पहिला टप्पा म्हणून मुलांना या संकल्पनेसाठी उद्युक्त करणे व त्यांची कार्यशाळा घेवून त्याना ही संकल्पना विषद करणे ही प्रक्रिया करण्यात आली. यावेळी MIDC असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर व आकार फाउंडेशनचे गजानन कांदळगावकर यांनी मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या टप्प्यात २९ व ३० जुलै रोजी एलिमिनेशन राऊंड पार पडले. यामध्ये एस.आर.एम. महाविद्यालयातील प्राध्यापकांचे चार सदस्यीय पॅनल अनुक्रमे प्राचार्या स्मिता सुरवसे, प्रा. अनंत लोखंडे, प्रा. राज चव्हाण, प्रा. आर. जी. गावडे व प्रा. अनुराधा गावडे तसेच गजानन कांदळगावकर आणि मोहन होडावडेकर यांनी या प्रक्रियेमध्ये परीक्षण करतांना व्यवसाय कल्पनेची स्पष्टता, सामाजिक/बाजारपेठेतील उपयुक्तता, नवोन्मेषाचा स्तर, सादरीकरण कौशल्य या निकषावर पडताळणी करून आलेल्या एकूण १७ संघातून ५ संघांची निवड दुसऱ्या फेरी करीता निवड केली आहे. संघ निवडीपासून प्राथमिक फेरीपर्यंत सर्व गोष्टींसाठी प्रा. गीताश्री ठाकूर व प्रा. सुवर्णा निकम यांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमासाठी क. म. शि. प्र. मंडळ, मंडळाचे सहकार्यवाह महेंद्र गवस तसेच महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत केनवडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या निवडलेल्या संघांना इन्क्युबेशन वर्कशॉप म्हणजे त्यांच्या संकल्पना व्यवसाईक दृष्ट्या सर्वांगाने परिपक्व होण्यासाठी आज दिनांक ११ ऑगस्ट रोजी या अंतिम स्पर्धकांना यशस्वी उद्योजक, व्यापारी आणि मोटिवेशनल स्पीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष व्याख्यान व कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत प्रणय तेली, राजेंद्र केसरकर आणि अविनाश वालावलकर मार्गदर्शन केले. यानंतर १ महिन्याचा विकास कालावधी या संघांना देण्यात आला असून त्याचे उद्योगाच्या प्रकारानुसार त्या व्यवसायाशी निगडीत तज्ञ व्यक्ती जोडून देण्यात येणार आहेत. हे तज्ज्ञ त्या संघांना उद्योग/व्यवसायाची प्रतिकृती / प्रकल्प तयार करणे किंवा सविस्तर बिझनेस प्लॅन सादर करणे याकरिता ऑनलाईन / ऑफलाईन मार्गदर्शन करणार आहेत.
या उपक्रमाच्या अंतिम फेरीत पोचलेल्या टीम मध्ये प्रथम क्रमांक हर्षदा शिर्के (तृतीय वर्ष आयटी), द्वितीय पूर्वा मिसाळ (प्रथम वर्ष बी एम एस), तृतीय तनिषा मालवणकर (तृतीय वर्ष बी ए एफ), चौथा क्रमांक संकेत कुलकर्णी (प्रथम वर्ष बी एम एस), पाचवा क्रमांक राखी सामंत (द्वितीय वर्ष बी एड एफ) यांचा समावेश आहे. अंतिम फेरीत १ महिन्यानंतर ४ ते ५ उद्योग तज्ञांच्या पॅनलसमोर व्यवसाय योजना सादरीकरण केले जाईल. ज्यामध्ये व्यवसाय मॉडेलची व्यवहार्यता, आर्थिक व्यवहार्यता, अंमलबजावणीची क्षमता, बाजारपेठ रणनीती, दीर्घकालीन दृष्टीकोन आदी नकाशावर पडताळणी केली जाईल. यामधून निवडल्या जाणाऱ्या प्रथम ३ संघांना आकार फाऊंडेशनकडून आकर्षक बक्षिसे व ट्रॉफी देण्यात येणार आहेत. तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर बैंकर (चैनल पार्टनर) कडून वित्तीय मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येणार असून वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प असल्यास इन्व्हेस्टर कडून गुंतवणुकीची संधीही उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाचे भागीदार म्हणून महाविद्यालयाचे प्राध्यापक परीक्षण, मार्गदर्शन, शैक्षणिक मान्यता या भूमिका पार पाडत आहेत. तर आकार फाऊंडेशन आयोजन, इन्क्यूबेशन लिंकेज, उद्योगतज्ञ मेंटॉरशिप व परीक्षण, बैंकर-निधी व आर्थिक साक्षरतेसाठी मार्गदर्शन, इन्व्हेस्टर दीर्घकालीन वाढीच्या संधी या भूमिका निभावणार आहेत.
Futurepreneurs हा केवळ स्पर्धा कार्यक्रम नसून, ग्रामीण व शहरी तरुणाईला स्वावलंबी, सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार उद्योजक बनविण्याचा एक ठोस प्रयत्न आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी MIDC असोसिएशन, कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघ आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांनी विशेष सहकार्य केले आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये व्यवसाय करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये खूप ऊर्जा आणि कल्पना आहेत. त्यामुळे डिसेंबर २०२५ मध्ये ही स्पर्धा आम्ही महाविद्यालीन विद्यार्थी गट आणि खुला गट अशा दोन गटांमध्ये घेणार आहोत. यासाठी भव्य बक्षीसे आणि मोठ्या बँका व पतसंस्था यांच्या माध्यमातून विजेत्यांना सहकार्य करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बँकर (चॅनल पार्टनर) कडून वित्तीय मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येणार आहे. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी हि संकल्पना राबवावी आणि जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला.
यावेळी संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ प्राचार्य डाॅ स्मिता सुरवसे, रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष राजीव पवार, असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने, आकार फाऊंडेशन गजानन कांदळगावकर, एम आय डी सी असोसीएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर व सचिव ॲड नकुल पार्सेकर, जिल्हा व्यापारी महासंघ उपाध्यक्ष नितीन तायशेटये, संस्था सदस्य महेंद्र गवस, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अभिजित परब, प्रमोद भोगटे, नीता गोवेकर ,आनंद वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.




