विजयराव नाईक फार्मसी कॉलेज चा दीक्षांत समारंभ उत्साहात

66 विद्यार्थ्यांना औषध निर्माता ही पदवी प्रमाणपत्र प्रदान
युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी चा दुसरा दीक्षांत समारंभ महाविद्यालयामध्ये शनिवार २६ जुलै २०२५ रोजी पार पडला. हा दीक्षांत समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या पूर्वसूचनेनुसार घेण्यात आला. हा दीक्षांत समारंभ उन्हाळी सत्र २०२४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने आयोजित केला होता. या दीक्षांत समारंभास संस्थेचे सचिव डॉ. रमण बाणे, व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. मंदार सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप, उपप्राचार्य डॉ.अमोल उबाळे, विभाग प्रमुख प्रा. अमर कुलकर्णी व प्रा. नमिता सागवेकर आणि परीक्षा विभाग प्रमुख प्रा. ऋषीकेश सोरटे यांची प्रमुख उपस्थिती होती . या कार्यक्रमादरम्यान ६६ विद्यार्थ्यांना औषध निर्माता शपथ घेऊन पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच विविध विद्यार्थ्यांनी खूप उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले. याव्यतिरिक्त GPAT आणि NIPER या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल कु. भक्ती वायंगणकर या विद्यार्थिनीचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान डॉ. रमण बाणे यांनी दिलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयाची माहिती येणाऱ्या ऑनलाइनच्या युगात खूप महत्त्वाची ठरेल. तसेच प्रा. मंदार सावंत यांनी विद्यार्थ्यांना कधीही भविष्यात महाविद्यालयाची गरज भासली तर विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे दरवाजे कायमच खुले असतील या शब्दात विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप यांनी फार्मसी क्षेत्राचे महत्त्व आणि आपला पूर्व खडतर प्रवास सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
युवक कल्याण संघाचे अध्यक्ष माजी आमदार वैभव नाईक, उपाध्यक्षा सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. मंदार सावंत यांनी दीक्षांत समारंभाच्या उत्कृष्ट आयोजनाचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नेहा गुरव यांनी केले व डॉ. अमोल उबाळे यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे आभार मानून दीक्षांत समारंभाची सांगता केली.