जाहीर माफी मागा अन्यथा महायुती बाबत सिंधुदुर्गात कोणतीही चर्चा नाही!

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा भरत गोगावले यांना इशारा

आमदार निलेश राणे यांच्यासह अनेक प्रमुख नेते व्यासपीठावर असताना भरत गोगावले यांचे वक्तव्य क्लेशदायक

भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायणराव राणे हे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते आहेत,. ते आमचे आदरस्थान आहेत. त्यांच्या बद्दल मंत्री भरत गोगावले यांनी जाहीर सभेत केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे.राणे यांच्या राजकीय इतिहास व त्यांच्या कार्यशैलीबद्दल केवळ आमच्या पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांचे जाहीरपणे कौतुक केलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद हे स्वतःच्या कर्तृत्वावर व लोकांच्या विश्वास व प्रेमावर मिळवलेले आहे. नारायणराव राणे हे जनतेने निवडून दिलेले खासदार आहेत. चार दशकांहून अधिक काळ जनतेची सेवा करणाऱ्या, महाराष्ट्राच्या व देशाच्या मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या राणे यांच्यावर अशा असंवेदनशील व बिनबुडाचे आरोप करून स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्याची धडपड भरत गोगावले यांनी करू नये. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात यश मिळालेले असताना सन्माननीय नारायणराव राणे यांच्या संदर्भात बेताल वक्तव्य करून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न राज्याचे मंत्री भरत शेठ गोगावले यांनी करू नये.
कालच्या भरत शेठ गोगावले यांच्या विधानामुळे कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र व संतप्त झाल्या असून अनेकजण व्यक्त झालेले आहेत.
भरत गोगावले यांनी खासदार नारायणराव राणे यांची जाहीरपणे माफी मागावी, त्यानंतरच जिल्ह्यातील महायुतीच्या यापुढील चर्चा होतील.असा इशारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कालच्या सभेत मा नारायणराव राणे यांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकून मंत्री झालेले उदयजी सामंत,आमदार दीपकभाई केसरकर,आमदार निलेशजी राणे आणि राणे यांनी घडवलेले शेकडो कार्यकर्ते व्यासपीठावर आणि समोर असताना गोगावले यांनी असे राणे साहेबांच्या उज्वल कारकिर्दीवर काळा डाग लावण्याचे धारिष्ट करावे ही सर्वात क्लेशदायक गोष्ट आहे,यापैकी कोणीही या विषयात त्या विधानानंतर व्यक्त झालेले नाही ही सर्वात खटकलेली गोष्ट आहे. महायुतीतील घटक पक्षातील सर्वच नेत्यांनी अत्यंत विचारपूर्वक व संयमाने विधाने करावीत.महायुती यशस्वी करण्याची जबाबदारी एकट्या भाजपची नाही हे ध्यानात घ्यावे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!