सांगवेत दुचाकींच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

कणकवली-कनेडी मार्गावर सांगवे-रामेश्वर मंदिर ते काळीथरवाडी दरम्यान सांगवे-हरकुळ बुद्रुक सीमेवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून दुचाकीस्वार आनंद सातेरी घाडी (34, रा.कलमठ, मुळ रा. बेळगाव) याचा डोक्याला दुखापत होवून जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीस्वार चिन्मय सुनिल शिरसाट (30,रा. नाटळ-पांगमवाडी) हा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी 6.15 वा.च्या सुमारास घडला.
नाटळ येथील चिन्मय शिरसाट हा एका बिस्किट एजन्सीकडे कामाला आहे. काम आटोपून तो आपल्या मोटरसायकलने नाटळ येथे निघाला होता. तर नाटळ येथे प्लास्टर काम करणारा आनंद घाडी हा त्याच्या दुचाकीने कणकवलीत येत होता. बुधवारी सायंकाळी 6.15 वा.च्या सुमारास भरधाव वेगाने जाणार्‍या दोन्ही मोटरसायकल स्वारांची काळीथरवाडी नजीक सांगवे येथे समोरासमोर जोरदार धडक बसली. यात दोन्ही मोटरसायकल स्वारांच्या डोक्याला गंभीररित्या दुखापत झाली. दोन्ही स्वार रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. याच दरम्यान कणकवलीहून कनेडीकडे जात असलेले सांगवे उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, माजी सरपंच महेश सावंत यांनी तातडीने दोघांनाही उपचारासाठी कनेडी प्रा. आ.केंद्राची रुग्णवाहिका बोलावून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जि.प.चे माजी अध्यक्ष संदेश सावंत हे देखील तातडीने उपजिल्हा रुग्णालयाकडे दाखल झाले. वैद्यकिय अधिकार्‍यांनी तातडीने उपचाराची कार्यवाही सुरु केली. यातील आनंद घाडी याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. तर दुसरा गंभीर जखमी चिन्मय शिरसाट याच्यावर प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी त्याला कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातात मृत्यू झालेला आनंद घाडी हा मुळचा बेळगावचा असून तो लादी, प्लास्टरचे काम करतो. अपघाताची माहिती मिळताच त्याच्या सहकार्‍यांनी आणि पत्नीने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!