शिक्षक समितीच्या कार्यपद्धतीला कंटाळून कणकवलीतील अनेक शिक्षकांचा शिक्षक भारती मध्ये जाहीर प्रवेश

110 पेक्षा जास्त शिक्षकांचा समावेश

        महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचा रविवारी शिक्षक मेळावा जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी शिक्षक समितीच्या कार्यपद्धतीला कंटाळून कणकवलीतील ११० पेक्षा जास्त शिक्षकांनी प्रमुख कार्यकर्त्यांसह शिक्षक भारती मध्ये प्रवेश केला. या मेळाव्याचे उद्घाटन जि. प . माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, राज्य संघटक किसन दुखंडे यांच्यासह तालुक्यांचे अध्यक्ष, सचिव तसेच जिल्हा व राज्यस्तरावरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
          यावेळी शिक्षकांचे नेते गिल्बर्ट फर्नांडिस यांच्यासोबत विनायक जाधव, प्रशांत बोभाटे, महेंद्र पवार, संदीप तांबे, प्रमोद पवार, दिलीप धामापूरकर, कल्पना मलये,  इंदू डगरे, दिलीप शेळके, अजित कदम, प्रकाश बुचडे, रवींद्र कुडतरकर, महेश चव्हाण, किरण कोरगांवकर , राजेंद्र जाधव , विलीस चोडणेकर, मंगेश लाड, समीर पाटील, सुभाष तांबे, उत्तम सातवसे, संदिप जाधव, सुनिल कदम इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांसह ११० पेक्षा जास्त शिक्षकांनी शिक्षक समितीतून शिक्षक भारती या संघटनेत प्रवेश केला. 
           याप्रसंगी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे आवाहन करत  युवा संदेश प्रतिष्ठान च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये शिक्षकांचा फार मोठा वाटा असल्याचे सांगितले. तसेच शिक्षकांच्या प्रश्नासाठी शिक्षक भारतीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
        नवीन संच मान्यता ही  शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मुळावर उठणारी व ग्रामीण शिक्षण व्यवस्था मोडीत काढणारी असल्याने राज्यभर या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिक्षक भारतीचे राज्य कार्य वाह संजय वेतुरेकर यांनी सांगितले.
        यावेळी मेळाव्याला संबोधित करत असताना गिल्बर्ट फर्नांडिस यांनी शिक्षक समितीमध्ये एकाधिकारशाहीने मनमानी कारभार चालला आहे. शिक्षकांच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने या कार्यपद्धतीला कंटाळून व शिक्षक भारतीच्या कार्याने प्रेरित होऊन अनेक शिक्षकांसह आपण शिक्षक भारती मध्ये प्रवेश करत असल्याचे सांगत ज्या शिक्षकांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला साथ दिली त्या सर्वांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सतत कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
         जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी शिक्षक भारती  शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी संघटना असल्याचे सांगत संघटनेच्या प्रभावशाली कामामुळेच शिक्षक भारतीकडे शिक्षकांचा ओढा वाढत आहे. या प्रवेशामुळे  शिक्षक भारतीचे बळ प्रचंड वाढल्याचे  सांगितले.
     यावेळी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या जिल्हा सरचिटणीस पदी गिल्बर्ट फर्नांडीस तर महेंद्र पवार यांची कणकवली तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
     जिल्हा उपाध्यक्ष म्हणून श्रीराम विभूते, सदस्य म्हणून श्री.दिलीप धामापूरकर व गोविंद वावदाने यांची निवड करण्यात आली. तर तालुकासचिव - संजय कोळी  कार्याध्यक्ष- दिलीप शेळके, कोषाध्यक्ष- संदीप तांबे, ,सहसचिव - मनोज पिळणकर, कार्यालयीन सचिव विलिस चोडणेकर यांची निवड जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीचा विस्तार तालुका कार्यकारिणीच्या पुढील सभेत करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष महेंद्र पवार यांनी दिली.
  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षक संघटनांच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा प्रवेश असल्याने शिक्षक समितीला हा फार मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
error: Content is protected !!