बेळणे खुर्द गावातील वीज समस्या सोडवा , अन्यथा आंदोलन

सरपंच अविनाश गिरकर यांचा इशारा ; विविध समस्यांबाबत वेधले लक्ष
कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द गावातील गेल्या काही दिवसांपासून वीज समस्या प्रलंबित आहेत. मात्र , संबंधित वीज अधिका-यांचे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे माहे मे अखेरपर्यंत गावातील वीज समस्या सोडवा , अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा बेळणे सरपंच अविनाश गिरकर यांनी उपकार्यकारी अभियंता विनोद बगडे यांना दिला आहे.
बेळणे खुर्द गावातील विद्युत वाहिनीवरील वाढलेल्या वेली , झाडे तोडणे, जीर्ण झालेले कंडक्टर , पोल बदलणे, वस्तीतील किंवा शेतजमिनीतून जाणाऱ्या वाहिनीवर स्पेसर बसवणे यासह विविध समस्या असल्याने नागरिकांना विद्युत पुरवठा होताना अडचणी होत आहेत. याबाबत श्री. गिरकर यांनी वीज अधिका-यांना निवेदन दिले. यावेळी येत्या 15 दिवसांत आपल्या गावातील विद्युत समस्या सोडवल्या जातील , असे आश्वासन उपकार्यकारी अभियंता विनोद बगडे यांनी श्री. गिरकर यांना दिले.