“एलसीबी” चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजु जामसांडेकर यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर

तब्बल 32 वर्षे पोलीस दलात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव
1 मे रोजी सिंधुदुर्गनगरी येथे होणार पदक प्रदान सोहळा
सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग (एलसीबी) मध्ये कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उर्फ राजू जामसांडेकर यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे. 1 मे रोजी ओरोस येथे गौरवपूर्वक सोहळ्यातले त्यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे. राजु जामसांडेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये पोलिस दलात कार्यरत असताना त्यांनी अनेक गुन्ह्याचा यशस्वीपणे तपास केला आहे. त्यांनी पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी, गुन्ह्याचे तपास काम तसेच सामाजिक शांतता राखण्यासाठी केलेली कामगिरी या सर्वांचा उत्कृष्ट कामगिरीमध्ये उल्लेख करत त्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे. राजु जामसंडेकर यांनी आतापर्यंत मालवण, कणकवली, वैभववाडी, जिल्हा विशेष शाखा, महामार्ग वाहतूक पोलीस व सध्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग या ठिकाणी एकूण 32 वर्ष पोलीस दलाल सेवा बजावली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागात काम करताना आपल्या नेटवर्क चा योग्य वापर करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यामध्ये राजु जामसंडेकर यांचे नाव लौकिक आहे. राजू जामसांडेकर यांना मिळालेल्या पोलीस पदकाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली